Pranali Kodre
इराणी कप २०२४ स्पर्धेचा सामना लखनौमधील एकाना क्रिकेट स्टेडियमवर २०२३-२४ रणजी ट्रॉफी विजेता मुंबई संघ विरुद्ध शेष भारत यांच्यात होत आहे. ५ ऑक्टोबर हा या सामन्याचा अखेरचा दिवस आहे.
आता ५ ऑक्टोबरला इराणी कप अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघ उचलणार की ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील शेष भारत संघ उचणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
हा सामना संध्या रोमांचक वळणावर आहे, त्यामुळे निकाल काहीही लागू शकतो. मात्र, जर हा सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित राहिला, तर विजेता कोणता संघ होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
तर नियमानुसार इराणी कप सामन्यात जर सामना ड्रॉ राहिला, तर या सामन्याच्या पहिल्या डावात ज्या संघाने आघाडी घेतलेली असते, त्या संघाला विजेता घोषित केले जाते.
या नियमानुसार जर मुंबई आणि शेष भारत यांच्यातील सामना ड्रॉ राहिला, तर रहाणेच्या मुंबई संघाला विजेता घोषित करण्यात येईल. कारण त्यांनी १२१ धावांची मोठी आघाडी पहिल्या डावात घेतली आहे.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर सर्वबाद ५३७ धावा केल्या होत्या.
त्याच्या प्रत्युत्तरात शेष भारत संघानेही पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. त्यांच्याकडूनही अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावांची खेळी केली.
त्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात चौथ्या दिवस अखेर ४० षटकात ६ बाद १५३ धावा केल्या आहेत. त्यामुळे ते २७४ धावांनी आघाडीवर आहेत.
आता पाचव्या दिवशी मुंबई संघ किती धावांचे आव्हान शेष भारत संघासमोर ठेवणार आणि शेष भारत ते आव्हान पूर्ण करणार की नाही, हे पाहाणं मनोरंजक ठरणार आहे.