कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गोष्टी कोणत्या? त्यांचा वापर कशासाठी होतो?

Amit Ujagare (अमित उजागरे)

एअरबॅग्स (Airbags)

अपघात झाल्यास चालक आणि प्रवाशाचं डोकं-छाती सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रन्ट, साइड एअरबॅग्स असतात. अपघाताच्या वेळी एअरबॅग्स काही मिली सेकंदात फुगतात. यामुळं चालक आणि प्रवाशांचे डोकं, छाती, चेहरा यांना डॅशबोर्ड, स्टेअरिंग किंवा विंडशील्डपासून बचाव होतो.

अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS)

जोरात ब्रेक मारल्यास वाहनाची चाकं लॉक होण्यापासून रोखतो. त्यामुळं वाहन घसरणे/स्लिप होणे टाळता येतं तसंच स्टेअरिंगवर नियंत्रण राखता येतं.

इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD)

प्रत्येक चाकाला गरजेनुसार ब्रेकफोर्स वेगवेगळ्या प्रमाणात पुरवला जातो. पुढच्या चाकांपेक्षा मागच्या चाकांना कमी फोर्स लागतो हे ओळखून ब्रेकिंग अधिक स्थिर ठेवतो.

ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS)

चाकं वेगात फिरू लागली की (उदा. पावसात, बर्फात) इंजिनला त्या चाकाचं पॉवर कमी करायला सांगतो. स्पीन होणारी चाकं स्थिर होईपर्यंत पॉवर कमी कमी होत जाते.

व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC/ESC)

गाडी वळण घेताना जर समतोल बिघडत असेल (जसं स्लिप होणे) तर वेगवेगळ्या चाकांवर स्वतंत्रपणे ब्रेक लागतो. इंजिन पॉवरही कमी करू शकतो. अपघात टाळण्यासाठी गाडी रस्त्यावर ठेवण्यास मदत होते.

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स (RPC)

मागे गाडी नेताना दिसत नसलेले अडथळे, भिंती, वस्तू, लहान मुलं यांचं भान रिव्हर्स पार्किंग कॅमेरामुळं राखलं जातं. सेन्सर अलार्म वाजवतात, कॅमेरा स्क्रीनवर दृश्यता दाखवतो.

हिल स्टार्ट असिस्ट (HSA)

चढावर थांबलेली गाडी पुन्हा सुरू करताना मागे घसरणार नाही, याची खात्री या तंत्राद्वारे केली जाते. ही सिस्टिम ब्रेक थोडा वेळ पकडून ठेवते, तोपर्यंत ड्रायव्हरला एक्सेलरेटर वापरता येतो.

चाईल्ड सीट अँकर्स (ISOFIX)

लहान मुलांची सीट योग्य रितीने सुरक्षित करण्यासाठी ISOFIX या स्टँडर्ड सिस्टमचा वापर होतो. त्यांना बेल्ट वापरून सीटवर बसवण्यापेक्षा हे जास्त सुरक्षित आहे.

क्रॅश सेन्सर्स

गाडीला मोठा धक्का लागल्यावर हे सेन्सर्स अ‍ॅक्टिव्ह होतात. ते एअरबॅग उघडणे, दरवाजे अनलॉक करणे यासारख्या कृती करतात.

टायर प्रेशन मॉनिटगरिंग सिस्टिम (TPMS)

टायरमधील हवेचा दाब कमी झाल्यास ड्रायव्हरला सूचना दिली जाते. कमी दाबामुळं टायर फुटतात किंवा नियंत्रण गमावलं जातं, ते यामुळं रोखता येतं.