सकाळ डिजिटल टीम
जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस/जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोपाळकाला करण्याची प्रथा आहे. या प्रथेमागचे कारणं काय आहेत जाणून घ्या.
गोपाळकाला हा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. कृष्ण लहानपणी आपल्या मित्रांसह (गोपाळांसह) गायी चारण्यासाठी रानात जात असे.
रानात गेल्यावर सर्व मित्र आपापल्या घरून आणलेले पदार्थ एकत्र करून खात असत. त्यात दही, दूध, लोणी, पोहे, ज्वारीच्या लाह्या असे अनेक पदार्थ मिसळले जायचे. या एकत्रित पदार्थालाच गोपाळकाला म्हणतात.
गोपाळकाला हे समानता आणि एकतेचे प्रतीक आहे. एकत्र पदार्थ मिसळून खाल्ल्याने कुणी गरीब किंवा श्रीमंत असा भेद राहत नव्हता. हेच कारण आहे की, दहीहंडी फोडल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन गोपाळकाला वाटून खातात.
दहीहंडी फोडल्यानंतर आत असलेला दही-लोण्याचा प्रसाद आणि सोबतच हा गोपाळकाला खाल्ला जातो. हा प्रसाद सर्वांना वाटून खाण्याची पद्धत आहे.
दिवसभर दहीहंडी फोडण्यासाठी लागणाऱ्या शारीरिक श्रमानंतर गोपाळकाला खाल्ला जातो. हा पदार्थ पोहे, दूध, दही, लोणी यांसारख्या पौष्टिक गोष्टींनी बनलेला असल्याने शरीराला ताकद देतो.
गोपाळकाला तयार करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ सहज उपलब्ध होतात, त्यामुळे कोणताही व्यक्ती तो तयार करू शकतो आणि वाटू शकतो.
हा सण केवळ धार्मिक नसून, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. गोपाळकाला हे सामाजिक सलोख्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते.
श्रीकृष्णाने आपल्या मित्रांसोबत खाण्यासाठी हा पदार्थ तयार केला, असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक जन्माष्टमीला ही परंपरा जपली जाते.