संतोष कानडे
बंजारा समाज भटकंती करणारा आणि पाठिवर संसार घेऊन उपजीविका भागवणारा गरीब समाज आहे.
पण याच समाजातला एक व्यक्ती एकेकाळी आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते.
लख्खीराय बंजारा असं या व्यक्तीचं नाव होतं. त्यांचा जन्म १५८० साली सध्याच्या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील मुझफ्फरनगर येथे झाला होता.
लख्खीराय बंजारा यांचं कुटुंब अकबराच्या काळापासून मुघली सैन्याला जिन्नस पुरवत असत.
पुढे लख्खीराय यांनी व्यापार मोठा केला. त्यात ते कापूस, चुना पावडर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड या गोष्टींचा मुघलांना पुरवठा करायचे.
लख्खीराय बंजारा यांचा ताफा मोठा होता. त्यांच्याकडे ४ तांडे होते. प्रत्येक तांड्यामध्ये ५ हजार बैलगाड्या आणि एक लाखांचं सैन्य असे.
तांड्यांमध्ये लाखो गाई, म्हशी, घोडे, हत्ती, खेचरं असत. एखाद्या भल्यामोठ्या शहराप्रमाणे हे तांडे भासायचे.
मध्य आशियातून भारतात होणारा व्यापार लखीराय यांच्या माध्यमातून होत असे. लाखो कुटुंबांचं पोट लखीराय यांच्यावर अवलंबून होतं.
प्रवासात त्यांनी अनेक विहिरी, धर्मशाळा, तळी आणि किल्ले बांधले. त्यांच्या तांड्यांचा ताफा जिथून जायचा तिथे रस्ता तयार होत असे.
शाहजहां आणि औरंगजेबाच्या दरबारात त्यांचा लख्खी शाह म्हणून त्यांचा सन्मान व्हायचा. दिल्लीतल्या लाल किल्ल्याचं ते मुख्य कंत्राटदार होते.
जगातला सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळख असणारा लोहगड किल्ला लख्खीराय यांच्यात अधिपत्याखाली होता.
लोहगडच्या आसपास त्यांनी ८० गावं वसवली, शस्त्रास्त्रांचे कारखाने उभारले. लखीराय यांच्या सैन्याने मुघलांनाही पळवून लावलं होतं.
त्या काळी आशिया खंडातला सर्वात श्रीमंत व्यापारी म्हणून लख्खीराय बंजारा यांची ओळख होती.