Amit Ujagare (अमित उजागरे)
'दलित पँथर' आणि नामदेव ढसाळ हे 'एक दिल, दोन जान' असं समीकरण आहे. ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी २१ मे १९७२ रोजी दलित पँथरची मुंबईत स्थापना केली होती.
नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी तर मृत्यू १५ जानेवारी २०१४ रोजी झाला.
विचारवंत, दलित चळवळीतील आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
मराठी साहित्य क्षेत्रात दलित साहित्याची जोड देत त्यांनी नवे आयाम जोडले.
सडेतोड आणि अत्यंत उत्कट असं त्यांचं लेखन होतं, त्यांच्या गोलपिठा या काव्यसंग्रहानं तर त्याकाळी खळबळ उडवून दिली होती.
'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हालवले' हा माओवादी विचारांवरील, 'प्रियदर्शिनी' हा इंदिरा गांधी यांच्यावरील त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहिरीनं मोठं योगदान देणारे शाहीर अमर शेख यांची कन्या आणि स्त्रीवादी लेखिका मल्लिका यांच्यासोबत नामदेव ढसाळ यांचा प्रेमविवाह झाला.
प्रचलित मराठी साहित्यातील प्रमाण भाषेला फाटा देत त्यांनी आक्रोशाच्या बोली भाषेला प्राधान्य दिलं. नामदेव ढसाळांच्या कवितांमध्ये आणि लिखाणात वेदना, विद्रोह अन् नकार हा स्थायीभाव आहे.
आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं. तसंच प्रत्यक्ष रस्तावर उतरुन जिथं दलितांवर अत्याचार घडतील तिथं न्यायही मिळवून दिला.
आजही दलित पँथर आणि नामदेव ढसाळ यांचं नाव काढलं तरी बंडखोर तरुणांच्या अंगावर उर्मीनं शहारे येतात.