संतोष कानडे
पंढरीच्या पांडुरंगाचं कर्नाटकशी असलेलं नातं तुम्हाला माहिती आहे का? विठोबाला कानडा म्हटलं जातं, ते त्यामुळेच.
वारकऱ्यांचं दैवत असलेले विठोबा आंध्र-कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचेही आराध्य दैवत आहेत.
पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड मजकुरामध्ये पंढरपूरचा उल्लेख ‘पंडरगे’असा आहे.
पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली.
विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते.
ज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे.
विठ्ठल हा कानडा आहे. ज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत.
एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे. तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे.
कर्नाटकातल्या हम्पी येथे विठ्ठलाचं मंदिर आहे. हम्पी हे 7 व्या शतकातील हिंदू विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठीही प्रसिद्ध आहे.
हम्पीचे विठ्ठल मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले. हे मंदिर म्हणजे विजयनगरच्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
काही इतिहासकार यामुळेच पांडुरंगाचं नातं कर्नाटकशी जोडतात. मात्र काही संतांनी, अभ्यासकांनी कर्नाटकू शब्दाची वेगळी फोड केलेली आहे.