सूरज यादव
भारतीय शेअर बाजारात सध्या घसरण सुरू आहे. सोमवारी आणि मंगळवारीही बाजारात घसरण झाली. निफ्टी २१९७४ अंकांवर उघडला आणि सेन्सेक्स ७२ हजार ७०० वर उघडला.
फेब्रुवारीत सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह बेंचमार्क इंडेक्स निफ्टी ५०ने २९ वर्षातली सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली. शेअर्सची विक्री थांबलेली नाहीय.
निफ्टी ५० ने गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत ४२७३ अंकांची आतापर्यंत घसरण झाली असून सोमवारी २२००५ वर निफ्टी ५० चा निर्देशांक पोहोचला.
बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २७ सप्टेंबरला ४७८ लाख कोटी रुपयांवरून ३८४ लाख कोटी रुपये इतकं राहिलंय.
अमेरिकेत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्यापार धोरणं अनिश्चित झाली आहेत. यामुळे व्यापारयुद्धाची चिंता भेडसावतेय. महागाईच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता नाही.
भारताच्या जीडीपीत सलग तीन तिमाहीत घसरण झालीय. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी वाढ आरबीआय़ आणि एनएसओच्या अंदाजापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. याचाही परिणाम शेअरबाजारात दिसतोय.
ऑक्टोबर महिन्यात एफआयआय़ने व्हॅल्युएशनमध्ये कमतरतेमुळे शेअर्स विक्रीला सुरुवात केली. यामुळे भारतीय शेअर बाजारात करेक्शनची सुरुवात झाल्याने बाजारात घसरण होत आहे.
भारतीय शेअर्सचं स्ट्रेच व्हॅल्यूएशन, जीडीपीत मंदी, चीनसारख्या बाजारांमध्ये चांगली किंमत, ट्रेड वॉरची चिंता यामुळे भारतीय बाजारांमधून एफआय़आय़ गुंतवणूक काढत आहेत. ऑक्टोबरमध्ये दीड लाख कोटी शेअर्सची विक्री झाली.
इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झालाय. तर भारतीय रुपया विक्रमी निच्चांकी स्तरावर पोहोचलाय. रुपया घसरल्यानं बाजारावरही परिणाम झाला असून दबाव वाढला आहे.