उन्हाळ्यात फ्रीजला आराम द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

अंकिता खाणे (Ankita Khane)

रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज ही आज प्रत्येक घराची गरज बनली आहे. उन्हाळा सुरु झाला कि त्याचा वापर जास्तच वाढू लागतो. फळे, दूध आणि भाज्यांसह अनेक खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची भूमिका महत्त्वाची असते.

उन्हाळ्यात आपण सतत फॅन वापरल्यानंतर त्याला काही वेळ विश्रांती देतो. पण आपण घेतलेला फ्रीज मात्र पहिल्या दिवसापासून सातत्याने सुरू असतो.

त्यात रेफ्रिजरेटर बनवणाऱ्या कंपन्याही ते किती वेळ चालू ठेवायचे हे सांगत नाहीत. फ्रीजला खरंच विश्रांतीची गरज असते का? जाणून घेऊया..

फ्रीजला मराठीत शीतकपाट म्हणतात. हे एक प्रकारचे कपाटच असते, ज्यामध्ये अन्न ठेवल्यास ते खराब होत नाही.

जोपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये विद्युतप्रवाह चालू राहतो, तोपर्यंत त्याचा कंप्रेसर (Compressor) काम करत राहतो आणि पर्यायाने आत शीतकरण प्रक्रिया (Cooling Process) चालू राहते.

फ्रीजची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे, की स्विच ऑफ केल्यानंतरही तो बराच काळ थंड राहतो आणि अन्न खराब होत नाही.

फ्रीज किती तास चालू शकतो?

रेफ्रिजरेटरचे काम दिवसाचे 24 तास अन्न ताजे ठेवणे आहे, त्यामुळे कंपन्या त्यांना दिवसाचे 24 तास सतत चालू ठेवण्यासाठीच डिझाइन करतात. म्हणजेच, फ्रीजला सतत चालू ठेवल्याने त्याचं कोणतंही नुकसान होत नाही.

रेफ्रिजरेटर हे एक इलेक्ट्रॉनिक कूलिंग उपकरण (Electronic Cooling Gadget) आहे, जे सतत चालण्यासाठी बनवले जाते. त्यामुळेच तुम्ही फ्रीज २४ तास चालू ठेवायला काहीही हरकत नाही.

तुम्ही वर्षभर रेफ्रिजरेटर बंद केला नाही, तरीदेखील त्यामध्ये काही अडचण येत नाही. अर्थात, फ्रीज साफ करण्यासाठी किंवा खराब झाल्यास दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तो निश्चितपणे बंद करावा लागेल.

मग अशा वेळी तुम्ही म्हणाल, की दिवसातील काही तास फ्रीज बंद करून आपण वीज वाचवू शकतो का? मात्र असं कराल तर त्याने तुमचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होऊ शकतो.

आपण फ्रीज 1-2 तास बंद ठेवू शकतो का?

आता फ्रीज १-२ तास बंद ठेवता येईल का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. जर तुम्ही दररोज फ्रीज १-२ तास बंद ठेवला, किंवा दिवसभरात अनेक वेळा तो चालू आणि बंद करत राहिलात, तर फ्रीज योग्य प्रकारे थंडावा देऊ शकणार नाही.

अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खराब होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे, फ्रीज १-२ तास बंद ठेवून वीज वाचवण्याचा प्लॅन देखील चांगला नाही.

कारण फ्रीज बंद-चालू केल्यामुळे त्याला पुन्हा पहिल्यापासून कंप्रेसर सुरू करावा लागतो. यामुळे अधिक उर्जा खर्च होऊन वीजबिल जास्तच येऊ शकतं. तुमचा रेफ्रिजरेटर आपोआप वीज वाचवण्यास सक्षम आहे.

सर्व वॉशिंग मशिन तर सेमच पण कंपनी वेगळी डिटर्जंट पावडर वापरण्यास का सांगते?