संतोष कानडे
सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.
राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवसा 55 डेसिबल तर संध्याकाळी 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली.
बैठकीमध्ये पोलिस आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील अधिकृत आणि अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्यास सांगितलेले आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार सध्या पुणे शहरामध्ये 1830 भोंगे विविध प्रार्थना स्थळांवर आहेत
पुणे शहरामध्ये सर्वसाधारण 1000 मंदिरे आहेत. तर 130 चर्च, 200 बौद्ध विहार, 300 मशिदी, 150 दर्गा आणि 50 मदरसे आहेत.
या ठिकाणी भोंगे असल्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. तसेच रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवले जाणार आहेत. त्यासाठीच हे सर्वेक्षण होणार आहे
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मनसेने भोंग्यांचं आंदोलन पेटवलं होतं. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यामध्ये सर्वच धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर अधिकृत भोंगे नियमानुसार चालू राहतील.