Amit Ujagare (अमित उजागरे)
ब्रिटिश इंडियात तत्कालीन सरकारनं अनेकांवर मनमानी पद्धतीनं अन्याय-अत्याचार केले, याचा एक जिवंत पुरावा अजूनही उपलब्ध आहे.
हा पुरावा म्हणजे एक झाड आहे, ज्याला एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं अटक केली होती. हे झाड म्हणजे जुलमी वसाहतवादाची साक्ष आहे.
१८९८ मध्ये जेम्स स्क्विड नामक ब्रिटिश अधिकाऱ्यानं तत्कालीनं भारताच्या वायव्य सीमेजवळील लंडी कोटल इथं (आज पाकिस्तान) एका झाडाला चक्क साखळदंड घालून अटक केली होती.
या घटनेला आता 127 वर्षे उलटली आहेत. हे झाड अजूनही जिवंत असून पाकिस्तान सरकारनं त्याचं चांगलं जतन केलं आहे.
लंडी कोटलच्या खोगीखेल जमातीचे प्रमुख इस्लाम खान शिनवारी सांगतात, "माझे आजोबा फतेह खान शिनवारी यांनी मला या झाडाबाबत सांगताना ब्रिटिश सैन्य अधिकारी किती क्रूर होते हे सांगितलं होतं.
शिनवारी सांगतात की, सध्या ज्या ठिकाणी हे झाड आहे ती जागा त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती. पण तेव्हा ब्रिटीशांनी त्यांच्या कुटुंबाकडून ती जबरदस्तीनं काढून घेत तिथं अधिकाऱ्यांची मेस बांधली होती.
या झाडावर अजूनही एक बोर्ड लिहिलेला आहे. "मी अटकेत आहे". सध्या पाकिस्तान आर्मीच्या लंडी कोटल कॅन्टोन्मेंटच्या परिसरात असलेलं हे झाड पर्यटक, परदेशी आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
एका संध्याकाळी मद्यधुंद अवस्थेतील जेम्स स्क्विडला हे झाडं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी येत असल्याचं भासलं. त्यानंतर घाबरुन त्यानं मेसच्या सार्जंटला झाडाला अटक करण्याचे आदेश दिले, त्यानंतर चक्क साखळदंड ठोकून या झाडाला अटक करण्यात आली.