Mansi Khambe
व्यक्तीला निरोगी ठेवण्यात हिमोग्लोबिनची भूमिका महत्त्वाची असते. पण कधीकधी शरीरात रक्ताची कमतरता भासते. जर वेळेवर समस्या सोडवली नाही तर ती गंभीर होऊ शकते.
सर्व वयोगटातील लोकांना अनेकदा रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची समस्या भेडसावते. रुग्णाला थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या येऊ शकतात.
मात्र याबाबत रक्ताची कमतरता दाखवून देणारी महत्त्वाची लक्षणे आणि त्यासाठी आवश्यक उपचारपद्धती काय असतील याची माहिती जाणून घ्या
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्ताची कमतरता असल्याने रुग्णाला नेहमीच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. थोडे काम करूनही ते खूप लवकर थकतात. बऱ्याचदा अशक्तपणामुळे रुग्णाची त्वचा, ओठ, जीभ किंवा नखे फिकट किंवा पिवळ्या रंगाचे होतात.
त्याचबरोबर अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता असल्यास शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे थोडे काम करून श्वास घेण्यास त्रास होतो. कधीकधी हृदयाचे ठोके खूप जलद होतात आणि छातीत अस्वस्थता जाणवू शकते.
याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, शरीरात लोह, फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी१२ अशा पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होतो.
याशिवाय महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, पोटात किंवा आतड्यात अल्सर, दुखापत किंवा शस्त्रक्रियेमुळे जास्त रक्तस्त्राव यामुळे देखील हे घडते. तसेच मूत्रपिंड किंवा यकृताशी संबंधित आजार, कर्करोग, संसर्ग अशा आजारामुळेही रक्ताची कमतरता भासते.
आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळे, अंडी, मासे, दूध यासारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी१२ शी संबंधित उत्पादने घ्या. वेळोवेळी तुमच्या रक्ताची तपासणी करत राहा.