संतोष कानडे
जुन्या जमान्यातही आजच्यासारखं मेसेंजर होतं आणि ते इंटरनेटप्रमाणेच क्षणात मेसेज पाठवायचं, असं सांगितलं तर वावगं वाटू नये.
मात्र हे खरं आहे. टेलिग्राम मशीन हे जुन्या जमान्यातलं एक प्रकारे व्हॉट्सअॅपच होतं. मात्र त्याचा वापर मर्यादित होता.
१८५० साली सुरु झालेली टेलिग्राम सेवा २०१३ मध्ये थांबवण्यात आली. याच सेवेला आपण ग्रामीण भाषेत तार असेही म्हणतो.
एखाद्याच्या घरी पोस्टमन तार घेऊन आला की घरात रडारड सुरु व्हायची. तारेच्या माध्यमातून एक तर चांगली बातमी दिली जायची किंवा वाईट बातमी.
हे टेलिग्राम मशीन दोन भागांमध्ये विभागलं जायचं. एक रिसिव्ह अँड सेंड मशीन आणि दुसरं मेसेज टाईप मशीन.
हा मेसेज म्हणजे इंग्रजी की-वर्ड नव्हते तर कोड लँग्वेज होती. '.-' या चिन्हांच्या माध्यमातून मेसेज लिहिला जायचा.
उदाहरणार्थ- एखाद्याला A टाईप करायचं असेल तर त्याने '.-' म्हणजे डॉट आणि डॅश लिहायचं. B लिहायचं असेल तर त्याने '-...' डॅश आणि ट्रिपल डॉट असं लिहायचं.
अत्यंत कमी शब्दांमध्ये हा मेसेज सेंड केला जायचा. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तो पाठवलाय तिथेही अशाच सांकेतिक भाषेत मेसेज मिळायचा.
पोस्ट ऑफिसेसच्या कोडनुसार हा मेसेज पाठवला जायचा. मिळालेला मेसेज पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी इंग्रजी भाषेत कन्व्हर्ट करायचे आणि पोस्टमनद्वारे पत्त्यावर पाठवायचे.
पोस्ट ऑफिसेस, सरकारी कार्यालये, मंत्रालयं अथवा भारतीय सैन्याकडे टेलिग्राम मशीन असायचं.
या सगळ्या संस्था वायरद्वारे जोडलेल्या होत्या. आजच्या लँडलाईनप्रमाणे. त्यामुळे त्याला 'तार' असं संबोधलं जायचं.