Saisimran Ghashi
भारतीय सशस्त्र दलातील दोन वरिष्ठ महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी (भारतीय लष्कर) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (भारतीय हवाई दल) यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माध्यमांसमोर एकत्रितपणे माहिती दिली.
ही पहिलीच वेळ होती की दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रासमोर अशा संवेदनशील आणि उच्चस्तरीय लष्करी कारवाईबाबत संयुक्तरित्या भाष्य केलं.
२०१६ मध्ये ‘एक्सरसाइज फोर्स १८’ या बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारताच्या लष्करी तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.
या सरावामध्ये १८ देशांनी सहभाग घेतला होता आणि कर्नल कुरेशी हे एकमेव महिला कमांडर होत्या, ज्यांनी ४० जणांच्या भारतीय तुकडीचं नेतृत्व केलं.
कर्नल कुरेशी या गुजरातमधील असून त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या एक सैनिकी परंपरेतील कुटुंबातून येतात.
कर्नल कुरेशी यांचे आजोबा, वडील यांनी भारतीय सेनेमध्ये सेवा दिली आहे आणि पतीदेखील सेनेत कार्यरत आहेत.
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये (UN PKO) सहा वर्ष सेवा दिली, विशेषतः २००६ मध्ये काँगोमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं.
त्यांनी एकदा म्हटलं होतं, "देशासाठी मेहनत करा आणि सगळ्यांचा अभिमान व्हा." त्यांच्या यशाने अनेक महिलांना लष्करी क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा दिली.
लेफ्टनंट जनरल बिपिन रावत (माजी दक्षिणी लष्करप्रमुख) यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, "कर्नल कुरेशी यांची निवड त्यांच्या क्षमतांवर आणि नेतृत्वगुणांवर आधारलेली होती, लिंगभेदावर नाही."