संतोष कानडे
आंतराराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. राम सुतार यांचं वय 100 वर्षे आहे.
राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे.
राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला आहे. सुरुवातीला सुतार यांना श्रीराम कृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केले.
1959 मध्ये सुतार यांनी दिल्लीत माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली. इथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरू केली.
पुढे त्यांनी दिल्लीत त्यांचा शिल्पकलेचा स्टुडिओ सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत सुतार यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे साकारले आहेत.
राम सुतार यांनी 1954 ते 1958 दरम्यान अजिंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले.
मध्य प्रदेशातील 45 फूट उंचीचे चंबळ स्मारक हे सुतार यांच्या कारकिर्दीतील पहिले मोठे आणि कौतुक झालेले काम होते.
हे स्मारक एका खडकापासून बनवण्यात आले होते आणि त्याचे अनावरण 1961 मध्ये करण्यात आले होते.
सुतार यांच्या इतर प्रसिद्ध शिल्पांमध्ये दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत यांचा 10 फूट लांबीचा कांस्य पुतळा, बिहारमधील कर्पुरी ठाकूर..
तसेच बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांचा पुतळा, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा 21 फूट उंच पुतळा आणि गुजरातमधील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश आहे.
1999 मध्ये, राम सुतार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री आणि नंतर 2016 मध्ये, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत.
ऑक्टोबर 2018 मध्ये, सुतार यांना 2016 च्या सांस्कृतिक समरसतेसाठी टागोर पुरस्कार मिळाला होता.