Vrushal Karmarkar
पेशवाईकालीन इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे 'साडेतीन शहाणे' होऊन गेले आहेत. यांच्या बाबत कमी लोकांना माहिती आहे. ते बुद्धी आणि धूर्ततेसाठी ओळखले जात होते.
मात्र पेशवेकाळात होऊन गेलेले हे साडेतीन शहाणे कोण आहेत? आता असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तसेच चौथ्याला अर्धाच का म्हटलं आहे?
तर 'सखा-देव-विठ्ठल-आणि अर्धज्ञानी नाना' अशी म्हण आहे. 'सखा' म्हणजे सखाराम बापू बोकील ते पेशव्यांच्या राजवटीतले सर्वात हुशार मंत्री होते.
'देवा' हे नागपूरचे जानोजी भोंसले यांचे सल्लागार देवाजीपंत चोरघडे होते. 'विठ्ठल' सुंदर परशुरामी हे निजाम अलींचे सल्लागार आणि सेनापती होते.
आणि 'नाना' होते नाना फडणवीस. त्यांना अर्धा शहाणा म्हटले जात असे. याचे कारणही तसेच आहे. हे चार पुरुष साम्राज्याचे बुद्धिमान, सर्वात हुशार लोक, पेशवे साम्राज्याचे शहाणे होते.
सखा हे एका जुन्या कुटुंबातील होते. त्याचे पूर्वज पंतजी गोपीनाथ होते. ज्यांनी १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने अफझलखानाच्या राजदूतांशी वाटाघाटी केली होती.
कुटुंबावर वाईट दिवस आले. सखाराम त्यांच्या तरुणपणी 'शागीर' म्हणून कामाला होते. जे बाजीराव पेशव्यांचे दिवाण सासवड येथील महादजी पुरंदरे यांच्या घरी शिक्षणासोबत इतर कामेही करत असे.
नागपूरचे देवाजीपंत चोरघडे त्यांनी १७५० च्या दशकात रघुजी भोसले यांच्याकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. रघुजींच्या मृत्युनंतर त्यांनी प्रथम जानोजींना उत्तराधिकार मिळवून देण्यात आपली चमक दाखवली.
विठ्ठल सुंदर, आधीच्या दोन ज्ञानी माणसांप्रमाणे 'देशस्थ' ब्राह्मण होते. त्यांनी नानासाहेब पेशव्यांकडे आपली कारकीर्द सुरू केली.
बालाजी जनार्दन 'नाना' फडणवीस हे अशा कुटुंबातील होते. ज्यांनी तीन पिढ्यांपर्यंत प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचे प्रभारी 'फडणवीस' म्हणून पेशव्यांची सेवा केली.
नाना फडणवीस हे चतुर राजकारणी होते. मात्र ते कधी युद्धासाठी उतरले नाहीत. म्हणून त्यांना अर्धा शहाणा म्हटलं जायचं.