Amit Ujagare (अमित उजागरे)
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला होता.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी हा धर्मांतराचा भव्य सोहळा नागपूर इथं पार पडला होता. त्यामुळं बौद्ध समाजात नागपूरला 'दीक्षा भूमी' असं संबोधलं जातं.
पण बाबासाहेबांनी धम्म दिक्षेसाठी नागपूर हेच शहर का निवडलं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
याच उत्तर देताना बाबासाहेब स्वतः म्हणालेत की, मला अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. रा.स्व.संघाची मोठी पलटन इथं असल्यानं त्याला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला का? पण हे चुकीचं आहे.
नागपूर हे ठिकाण निवडण्यामागचं कारण वेगळं आहे. बौद्ध इतिहास पाहिला तर तुमच्या हे लक्षात येईल की, बौद्ध धर्माचा प्रसार हा नाग लोकांनी केला. नाग लोक हे आर्यांचे शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या इतिहासात तुंबळ लढाया झाल्या आहेत.
नागांचेच आपण वंशज आहोत, या नाग लोकांना आर्यांनी जाळून मारल्याचे उल्लेख पुराणात आहेत. एवढा मोठा छळ सोसावा लागलेल्या नागांच्या उद्धारासाठी गौतम बुद्ध हा महापुरुष होऊन गेला. त्यानंतर बुद्धाचा संदेशच नाग लोकांनी भारतात पसरवला.
याच नाग लोकांची वस्ती आत्ताच्या नागपूर शहराच्या आसपास होती. या शहराजवळून याच नाग लोकांच्या वस्तीची ओळख असलेली नाग नदी वाहते.
याच आपल्या पूर्वजांच्या आठवणीत मी बौद्ध धर्माच्या दिक्षेसाठी नागपूर हे ठिकाण निवडलं. यामध्ये कोणालाही खिजवण्याचा प्रयत्न नाही.