अॅमेझॉन, फ्लिपकार्टची ‘कॅश ऑन डिलीवरी’ सेवा बंद

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

काळा पैशावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने काल देशांतर्गत आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली. उत्पन्न प्रारुपाचा(रेव्हेन्यू मॉडेल) महत्त्वाचा भाग असलेल्या 'कॅश ऑन डिलीवरी'तून ई-कॉमर्स कंपन्यांना 60 टक्के उत्पन्न मिळते

नवी दिल्ली: देशांतर्गत आर्थिक व्यवहारात पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम झाला आहे. फ्लिपकार्ट व स्नॅपडीलसारख्या कंपन्यांनी रु.1000 ते रु.2000 दरम्यान उत्पादनांच्या वितरणावर 'कॅश ऑन डिलीव्हरी' सेवा बंद केली असून प्रतिस्पर्धी अॅमेझॉननेदेखील ही सेवा काही काळाकरिता पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

"सध्या आम्ही काही नव्या ऑर्डर्सकरिता 'कॅश ऑन डिलीवरी' सेवा पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांनी 8 तारखेच्या पुर्वी ऑर्डर दिल्या होत्या त्यांना डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा व्यवहारात असलेल्या चलनी नोटांच्या माध्यमातून पैसे भरता येतील. भविष्यातील ऑर्डर्सकरिता नवीन इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा पर्याय शोधण्यात येत आहे. लवकरच कॅश ऑन डिलीवरी सेवा पुन्हा सुरु केली जाईल", असे अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

येत्या काळात कॅश ऑन डिलीवरीची मर्यादा वाढविली जाईल, असे स्नॅपडीलकडून सांगण्यात आले आहे. ज्या ग्राहकांकडे पैसे नाहीत अशांना उशीरा उत्पादन वितरीत करण्याचा पर्याय कंपनीकडून देण्यात आला आहे.

Web Title: amazon stops cash on delivery