भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या स्प्लेंडर बाईकचा इतिहास

शशांक पाटील
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी बाईक अशी ओळख असणाऱ्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडरचा जन्म १९९४ चा.

भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी बाईक अशी ओळख असणाऱ्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडरचा जन्म १९९४ चा. आजपासून २५ वर्षांपूर्वी भारताच्या हिरो आणि जपानच्या होंडा कंपनीने मिळून तयार केली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर. ही बाईक आली तीच जणू भारतातील बाईकच्या बाजारावर राज्य करण्यासाठी. ८० ते ९० च्या दशकात भारतीय बाजारात बाईक येण्यास सुरुवात झाली होती. त्याआधी म्हणजे १९५५ ते १९६९ पर्यंत रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट आणि आयडिअल कंपनीची येझडी २५० या केवळ दोन बाईकच भारतीय बाजारात उपलब्ध होत्या. त्यानंतर १९८१ च्या सुमारास भारताच्या टीवीएस कंपनीने जपानच्या सुझूकीसोबत; तर बजाजने कावासाकीसोबत मिळून आपल्या बाईक भारतीय बाजारात दाखल केल्या.

सर्वच कंपन्या आपल्या आधुनिक बाईक भारतीय बाजारात आणत होत्या. मात्र, या सर्वच बाईक्‍सची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती आणि हीच बाब लक्षात घेत हिरो सायकल्सने जपानच्या होंडा कंपनीसोबत मिळून १९९४ मध्ये हिरो होंडा स्प्लेंडर भारतीयांसाठी सादर केली. ९७ सीसीचे इंजिन आणि चार गिअर असणारी स्प्लेंडर ही एप्रिल १९९४ मध्ये भारतीय बाजारात दाखल झाली. वजनाला हलकी, दिसायला साधी आणि मायलेजच्या बाबतीत सर्वात उत्तम असणारी स्प्लेंडर ही किमतीलादेखील सामान्यांना परवडेल अशी होती. त्यामुळे भारतीय बाजारातील इतर दिग्गज कंपन्यांच्या बाईकला मागे टाकत स्प्लेंडरची विक्री सुसाट होऊ लागली. बघता बघता स्प्लेंडर गावापासून ते शहरा-शहरांतील रस्त्यांवर दिमाखात धावू लागली. याआधी अशाप्रकारची लोकप्रियता कोणत्याच बाईकला मिळाली नव्हती.

राजदूतसारख्या काही भारतीय बाईक ग्राहकांत लोकप्रिय झाल्या खऱ्या; मात्र योग्य वेळी ग्राहकांच्या मागणीनुसार बाईकमध्ये हवे ते बदल न केल्याने राजदूतसारख्या अनेक बाईक्‍सची लोकप्रियता कमी झाली. हीच बाब लक्षात ठेवून हिरोने मात्र आपल्या स्प्लेंडरमध्ये योग्य वेळी योग्य बदल करत बाईकचे नवनवीन मॉडेल बाजारात आणले. 
बाईकच्या लॉन्चनंतर १० वर्षांनी २००४ मध्ये स्प्लेंडर प्लस बाजारात आणत कंपनीने पहिला बदल केला. नवीन स्प्लेंडर प्लसमध्ये मल्टी-रिफ्लेक्‍टर, टेल लाईट, नवीन ग्राफीकसारखे काही बदल करण्यात आले होते. ज्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी २००७ मध्ये ॲलोय व्हिल्स आणि बॉडी फेइरिंग्स टाकत स्प्लेंडरला आणखी स्टायलिश करत कंपनीने बाईकची लोकप्रियता कायम ठेवली.

२०१० मध्ये जेव्हा होंडा आणि हिरो यांनी भागीदारी तोडत स्वतंत्र बाईक तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हिरो कंपनीने होंडाच्या मालकीचे शेअर विकत घेत स्वत: बाईक तयार करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सुरुवातीपासून एकत्र बाईक तयार करणाऱ्या दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्यानंतरदेखील स्प्लेंडरची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही. हिरो कंपनीनेदेखील आपल्या सर्वच बाईकमध्ये आणखी काम करत नवनवीन बाईक बाजारात आणल्या. मात्र, आपली आयकॉनीक बाईक स्प्लेंडरवर तितकेच लक्ष ठेवत २०१४ मध्ये स्प्लेंडर आयस्मार्ट हे मॉडेल तयार केले आणि बाजारात आणखी एक नवीन प्रकारची स्प्लेंडर दाखल झाली.

दिवसेंदिवस स्प्लेंडरची विक्री आणखीच वाढू लागली. २०१६ ला तर स्प्लेंडरला भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक असा सन्मानदेखील मिळाला होता. सध्या नवीन स्प्लेंडर बाईकची एक्‍स शोरुम किंमत ५१ हजारांपासून ते ५६ हजारांपर्यंत आहे. स्प्लेंडर प्रतिलिटर पेट्रोलमागे ८० किमी धावते, असा कंपनीचा दावा आहे. २५ वर्षांनंतरही स्प्लेंडर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी आणि सर्वाधिक चाललेली बाईक असा मान मिळवून दिमाखात मायलेजची राणी म्हणून सर्व भारतीयांच्या मनात विराजमान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of the most used splendor in India