नोटाबंदी: सोन्याच्या मागणीत मोठी घट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पॅन कार्डसंदर्भातील नियम, नोटाबंदी, दागिन्यांवरील उत्पादन शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ, उत्पन्न उघड करण्यासंदर्भातील नियमावली अशा विविध कारणांमुळे सोन्याची एकंदर देशांतर्गत मागणी घटली

मुंबई - नोटाबंदी, सराफांचा संप आणि पॅन कार्ड वापरण्यासंदर्भातील नियमामुळे भारतामधील सोन्याची मागणी 2016 मध्ये तब्बल 21 टक्‍क्‍यांनी घटल्याचे जागतिक सुवर्ण संस्थेने (डब्ल्यूजीसी) म्हटले आहे. भारतामध्ये 2015 मध्ये विकल्या गेलेल्या 857.2 टन सोन्याच्या तुलनेमध्ये 2016 या वर्षात 675.5 टन सोन्याचीच विक्री झाली आहे. याचबरोबर देशामध्ये सोन्याच्या दागिन्यांची असलेली मागणीही तब्बल 22.4 टक्‍क्‍यांनी घसरली आहे.

"2016 या वर्षात भारतामधील सोन्याची मागणी वेगाने घसरली आहे. दिवाळी व लग्नतिथींमुळे वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी 3 टक्‍क्‍यांनी वाढली. मात्र पॅन कार्डसंदर्भातील नियम, नोटाबंदी, दागिन्यांवरील उत्पादन शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ, उत्पन्न उघड करण्यासंदर्भातील नियमावली अशा विविध कारणांमुळे सोन्याची एकंदर देशांतर्गत मागणी घटली. मात्र या धोरणांचा उद्देश अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि सोने व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्याचा आहे. यामुळे सुवर्ण क्षेत्राबरोबरच ग्राहकांचाही नक्कीच फायदा होणार आहे,'' असे डब्ल्यूजीसीच्या भारतीय शाखेचे व्यवस्थापकी संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले आहे.

Web Title: India's gold demand fell sharply in 2016