व्याजदर कपातीची शक्‍यता धूसर

पीटीआय
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे.

जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण झाली असून, याचा परिणाम पतधोरण आढाव्यावर होणार आहे. नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये पाचशे व हजारच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. यामुळे बॅंकांनी गेल्या महिन्यात व्याजदरात 1 टक्‍क्‍यापर्यंत कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात करावी, अशी बॅंकिंग क्षेत्राची मागणी आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे वाढते भाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय, यामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले. यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समिती व्याजदराबाबत सावध पवित्रा घेण्याचा अंदाज आहे.

पतधोरण समितीचा हा तिसरा आढावा आहे. पहिल्या आढाव्यात ऑक्‍टोबरमध्ये रेपो दरात 0.25 टक्के कपात करून ते 6.25 टक्‍क्‍यांवर आणण्यात आले होते. डिसेंबरमधील आढाव्यात रेपो दरात बदल करण्यात आले नव्हते. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी 2015 पासून रेपो दरात 1.75 टक्के कपात केली आहे. उद्योग क्षेत्रातील संघटना "फिक्की'च्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बॅंक "जैसे थे' ठेवण्यास प्राधान्य देईल आणि पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत व्याजदर कपात करेल.
पतधोरण समितीने चलनवाढ 2011 पर्यंत 4 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्याचे निश्‍चित केले आहे. डिसेंबरमध्ये सलग पाचव्या महिन्यात किरकोळ चलनवाढीत वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ चलनवाढ 5.61 टक्के होती. याला महागलेल्या भाज्या आणि तृणधान्ये कारणीभूत ठरली होती. घाऊक चलनवाढ डिसेंबरमध्ये 3.39 टक्‍क्‍यांवर गेली, याला खाद्यपदार्थांची महागाई कारणीभूत ठरली होती. यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडूून आगामी पतधोरणात व्याजदर कपातीची शक्‍यता धूसर आहे.

बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी आहे.
- शेखर घोष, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बंधन बॅंक

चलनवाढ, वित्तीय तूट नियंत्रणात असल्याने रेपो दरात 0.25 टक्के कपात होणे अपेक्षित आहे. विकासाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यामुळे त्याला रिझर्व्ह बॅंक चांगला प्रतिसाद देईल.
- आर. के. गुप्ता, कार्यकारी संचालक, बॅंक ऑफ महाराष्ट्र

बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून 0.25 टक्के कपात होण्याची शक्‍यता आहे.
- आर. के. टक्कर, व्यवस्थापकीय संचालक, युको बॅंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interest rates may be as it is