रेपो दर 'जैसे थे'; रिव्हर्स रेपो दरात वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) अपेक्षेप्रमाणे रेपो दर कोणताही बदल न करता "जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम राहणार आहे. मात्र, रिव्हर्स रेपो दर 0.25 टक्‍क्‍यानी वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे.

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) अपेक्षेप्रमाणे रेपो दर कोणताही बदल न करता "जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम राहणार आहे. मात्र, रिव्हर्स रेपो दर 0.25 टक्‍क्‍यानी वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. यामुळे बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडे जमा असलेल्या रकमेवर अधिक व्याज मिळू शकणार आहे. नोटाबंदीनंतर हा रिझर्व्ह बॅंकेचा तिसरा पतधोरण आढावा होता.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चिततेच्या सावटामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दर स्थिर राहण्याची शक्‍यता उद्योग आणि बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे सातवे द्वैमासिक पतधोरण आहे. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात मागील वर्षी एप्रिलमधील पतधोरणात रेपो दरात कपात झाली होती. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यात पाव टक्‍क्‍यांची कपात केल्यानंतर जून, ऑगस्ट आणि ऑक्‍टोबरमधील पतधोरणामध्ये रेपो दरात कपात करण्यात आली नव्हती.

रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व्ह बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. हा दर वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं; तर रेपो दर कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने दर वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना प्रत्यक्ष ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात; तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडून मिळत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

अर्थविषयक अधिक बातम्यांसाठी क्‍लिक करा : sakalmoney.com

 

Web Title: No change in repo rate of RBI