विवाहासाठी काढता येणार अडीच लाख रूपये!

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने ज्या कुटुंबात विवाहकार्य होत आहे अशा कुटुंबाना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने अशा कुटुंबियांसाठी बॅंकेतून दोन लाख पन्नास हजार रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने ज्या कुटुंबात विवाहकार्य होत आहे अशा कुटुंबाना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने अशा कुटुंबियांसाठी बॅंकेतून दोन लाख पन्नास हजार रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी आज पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली. ज्या कुटुंबात विवाहकार्य आहे अशा कुटुंबातील एका व्यक्तीला अडीच लाख रुपयांची रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु कुटुंबातील एका व्यक्तीला एका खात्यातूनच ही रक्कम काढता येईल, असेही दास यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शुक्रवारपासून (दि. 18) दररोज 4500 रुपयांऐवजी केवळ 2000 रुपये बॅंकांतून बदलून मिळतील असेही त्यांनी स्पष्ट केले. नोटा रद्द झाल्यानंतर ही मर्यादा 4000 रुपये होती. मात्र त्यानंतर ती वाढवून 4500 करण्यात आली होती. आता पुन्हा त्या रकमेत बदल करण्यात आला असून ती आता 2000 रुपयांवर पोचली आहे. त्यापेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा असल्यास त्या बॅंकेत जमा करता येतील असेही दास यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने अचानक व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशातील जनतेची काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. स्वत:कडे असलेल्या पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी आणि त्याबदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी लोक बॅंकांमध्ये गर्दी करत आहे. याशिवाय एटीएममधील रोख रक्कम काढण्यासाठीही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे एटीएम काही तासात "कॅशलेस' होत आहेत. अशा परिस्थिीतत ज्या कुटुंबात विवाहसमारंभ आहेत अशा कुटुंबांची अडचण दूर करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: One member of the family can withdraw upto Rs 2.5 lakhs for a wedding