पेट्रोल 100?

पीटीआय
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. इंधन दरवाढीचा वेग असाच राहिला तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल शंभरी गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. इंधन दरवाढीचा वेग असाच राहिला तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल शंभरी गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर अनुक्रमे ११ पैसे व ५ पैसे वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलच्या दराने प्रथमच ९० रुपयांची पातळी ओलांडली. मुंबईत आज इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.०८ रुपयांवर पोचला, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.५८ रुपयांवर गेला. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२.७२ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७४.०२ रुपयांवर गेला.

कोलकत्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८४.६३ रुपये आणि डिझेलचा दर ७५.९५ रुपयांवर पोचला. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८६.०८ आणि डिझेलचा दर ७८.३५ रुपयांवर गेला.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा खनिज तेल आयातदार देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव मागील पाच आठवड्यांत ७१ डॉलरवरून ८० डॉलरवर गेला आहे. याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपयात ५ ते ६ टक्के घसरण झाली आहे. यामुळे खनिज तेलाची आयात महाग होऊन देशांतर्गत इंधनदरवाढ होत आहे.

पाच सत्रांत ८.४८ लाख कोटींचा फटका
जागतिक शेअर बाजारांतील पडझडीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने सोमवारी लोळण घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ५३६ अंशांनी कोसळला. मागील सात महिन्यांत एकाच दिवसांत झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. मागील सलग पाच सत्रांत सेन्सेक्‍समध्ये १ हजार ७८५ अंश म्हणजेच पाच टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना ८.४८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

ऑगस्टच्या मध्यापासून ५.५८ रुपये वाढ 
ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५.५८ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५.३ रुपये वाढ झाली आहे. मागील वर्षी जूनमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर दैनंदिन स्वरूपात बदलण्यास सुरवात झाल्यानंतर प्रथमच एवढ्या कमी काळात एवढी मोठी दरवाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol rate Increase