रुपयाचे डॉलरसमोर लोटांगण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई : भांडवली बाजारातून परकी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्यामुळे चलन बाजारात डॉलरची प्रचंड मागणी वाढली. यामुळे रुपयाने डॉलरसमोर लोटांगण घालत प्रथमच 73 ची पातळी ओलांडली. दिवसअखेर तो 43 पैशांच्या अवमूल्यनासह 73.34 वर बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील महागाईने आयातीचा खर्च प्रचंड वाढणार असून, वित्तीय तूट आवाक्‍याबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. 

रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना गुंतवणूकदारांवर प्रभाव टाकू शकल्या नाहीत. तुर्कस्तानमधील चलन संकट, आशियातील भारत, इंडोनेशियासह इतर विकसनशील अर्थव्यवस्थांना बसत असल्याचे चलन बाजार विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. परकी गुंतवणुकीचा ओघ बाहेर जात असल्याने सकाळच्या सत्रात रुपयाने 73.42ची नीचांकी पातळी गाठली होती. शेअर बाजाराच्या अंदाजानुसार परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज बाजारातून 1 हजार 550 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. यामुळे चलन बाजारात डॉलरची मागणी वाढली. 

अमेरिकेतील वाढते व्याजदर, रोख्यांमधील परतावा आणि कच्च्या तेलाच्या भाववाढीने गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री करून पैसे काढून घेण्यास प्राधान्य दिले. यामुळे बॅंकांकडून डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. तेल वितरकांसाठी विशेष खिडकी सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिल्याने बाजारातील वातावरण बिघडल्याचे एचडीएफएसीचे प्रमुख संशोधक व्ही. के शर्मा यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेच्या अनुपस्थितीमुळे रुपयाला आधार मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. 

...तर रुपयाची पंचाहत्तरी! 
जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल 88 ते 90 डॉलरपर्यंत वाढला, तर रुपयाचे 75 पर्यंत अवमूल्यन होण्यास फार वेळ लागणार नाही, असा अंदाज एडलवाइज सिक्‍युरिटीजचे परकी चलन विभागाचे प्रमुख सजल गुप्ता यांनी व्यक्‍त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of the rupee falls below the dollar