‘टीसीएस’मधूनही सायरस मिस्त्रींना डच्चू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी टाटा सन्सने केली आहे. याबाबत टीसीएस आणि इंडियन हॉटेल्स कंपनीच्या भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी टाटा सन्सने केली आहे. याबाबत टीसीएस आणि इंडियन हॉटेल्स कंपनीच्या भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. 

टाटा सन्सकडे शंभर अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची मालकी आहे. सूमहातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या टीसीएसच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आली असून, इशात हुसेन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. टीसीएसमध्ये टाटा सन्सचा ७३.२६ टक्के हिस्सा असून, मिस्त्री यांची कंपनीच्या संचालक मंडळावरून हकालपट्टी करण्याचा ठरावावर निर्णय घेण्यासाठी भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. मिस्त्री यांच्या जागी हुसेन यांची निवड करण्यात आल्याचे पत्र टाटा सन्सने टीसीएसला काल (ता. ९) पाठविले. यामुळे मिस्त्री हे आता अध्यक्ष राहिले नसून त्यांच्या जागी हुसेन हे अध्यक्ष असतील, असे टीसीएसने म्हटले आहे. याचप्रमाणे इंडियन हॉटेल्स कंपनीत टाटा सन्सचा २८.०१ टक्के हिस्सा असून, या कंपनीच्या संचालक मंडळातून मिस्त्री यांना हटविण्यासाठीही विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. 

मिस्त्रींनी हटविण्याच्या मोहिमेला जोर 

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर टाटा सन्स आणि मिस्त्री यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिस्त्री यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शापूरजी पालनजी सूमहाचा टाटा समूहात १८.४१ टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा आले असले, तरी सूमहातील महत्त्वाच्या कंपन्यांचे अध्यक्षपद मिस्त्री यांच्याकडेच आहे. यात इंडियन हॉटेल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे. 

कोण आहेत हुसेन? 

इशात हुसेन हे टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. यात टाटा स्टील, व्होल्टाज यांचा समावेश आहे. टीसीएसच्या अध्यक्षपदी नवा स्थायी अध्यक्ष येईपर्यंत ते या पदावर असतील. सध्या ते व्होल्टाज आणि टाटा स्कायचे अध्यक्ष आहेत.

Web Title: TCS dropped outset Cyrus Mistry