ब्रिटिश सरकारची मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

गेल्या महिन्यात ब्रिटिश सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती केली होती. आता त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे

लंडन: बँकांकडून नऊ हजार कोटींचे घेतलेले कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारने परवानगी दिली आहे. लवकरच ब्रिटनचे न्यायालय मल्ल्याच्या विरोधात वॉरंट काढणार आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याने दिली.

ब्रिटनच्या स्थानिक न्यायालयाने मल्ल्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात ब्रिटिश सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती केली होती. आता त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे.

विजय मल्ल्याला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 17 बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे कर्जाची थकबाकी नऊ हजार कोटींपर्यंत वाढली आहे.

Web Title: UK clears India’s request for Vijay Mallya’s extradition