शेअर बाजारात 'हिलरी लाट’ कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढली असली तरी जोखीमही वाढली आहे. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठे चढउतार मागील काही काळात झाल्याने गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत.
- आनंद जेम्स,

मुख्य मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित बीएनपी परिबास फायनान्शियल सर्व्हिसेस

मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वाढून 8 हजार 543 अंशांवर बंद झाला.

अमेरिकेच्या निवडणुकीतील कौलाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. यातच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार आणखी सुधारणा करेल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तूट भरून काढेल, असे म्हटल्याने शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले. सेन्सेक्‍सची सुरवात सकाळी चांगली झाली. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढला. निर्देशांक बंद होताना पुन्हा त्यात वाढ झाली. अखेर सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. वाहननिर्मिती, तेल व नैसर्गिक वायू, बॅंका, फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर दिसून आला.

आशियाई देशांतील शेअर बाजारही आज वधारले. हॉंगकॉंगच्या हॅंगसेंग निर्देशांकात 0.47 आणि चीनच्या शांघाय निर्देशांकात 0.46 टक्के वाढ झाली. जपानचा निक्केई निर्देशांक मात्र, स्थिर राहिला. युरोपीय देशांतील शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली. ब्रिटन 0.10, जर्मनी 0.05 आणि फ्रान्स 0.15 टक्के वाढ सुरवातीच्या सत्रात झाली.
 

Web Title: hillary wave continues at share market