याहूची 3 कोटी 20 लाख खाती “हॅक’

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

ऑगस्ट 2013 मध्ये कंपनीच्या एक अब्जहून अधिक खात्यांचा ताबा मिळविण्यात आला होता. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गोपनीय माहितीची चोरी ठरली आहे...

वॉशिंग्टन : याहू इनकॉर्पोरेशनच्या 3 कोटी 20 खात्यांचा ताबा हॅकर्सनी मागील दोन वर्षांत बनावट कुकीजच्या आधारे मिळविला होता, असे कंपनीने जाहीर केले आहे. आधी हॅकिंग केलेले सरकार पुरस्कृत गट सध्या हॅकिंगचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही कंपनीने केला आहे.

याहूने म्हटले आहे, की कंपनीच्या 50 कोटी खात्यांचा ताबा 2014 मध्ये घेण्यात आला होता. यामागे सरकार पुरस्कृत गट होते. आताच्या हॅकिंगमध्येही त्यांचाच हात आहे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, बनावट कुकीजचा वापर करून अनधिकृतपणे खात्यांचा ताबा मिळविण्यात आला. आता या कुकीज अवैध ठरविण्यात आल्या असून, यापुढे त्यांचा वापर अशाप्रकारे करता खात्यांचा ताबा मिळविण्यासाठी करता येणार नाही. बनावट कुकीजमुळे हॅकरला पासवर्डशिवाय खात्याचा ताबा मिळविता येतो. ऑगस्ट 2013 मध्ये कंपनीच्या एक अब्जहून अधिक खात्यांचा ताबा मिळविण्यात आला होता. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गोपनीय माहितीची चोरी ठरली आहे.

मेयर यांना रोख बोनस नाही
याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मरिसा मेयर यांच्या कार्यकाळात सुरक्षाविषयक प्रश्‍न निर्माण झाल्याचा फटका त्यांना बसणार आहे. कंपनीने त्यांना मागील वर्षीचा रोख बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याहूची मूळ मालमत्ता व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार असून, यासाठी कंपनीने आधी लावलेली बोली 350 दशलक्ष डॉलरने कमी करून 4.48 अब्ज डॉलरवर आणली आहे.

Web Title: Yahoo punishes CEO in latest fallout from security breakdown