विलिनीकरणाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांचा 22 ऑक्‍टोबरला संप

सकाळ न्युज नेटवर्क
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसीय संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र बॅंकिंग व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी 22 ऑक्‍टोबरला संपाची हाक दिली आहे. लाखो कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

या संपाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. 14) मुंबईत आझाद मैदानात महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या शेकडो सदस्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या चार संघटनांनी वेतनश्रेणी, रिक्त पदांची भरती आणि विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी संपाची हाक दिली होती; मात्र अर्थसचिवांनी मध्यस्थी करून हा संप मागे घेण्यास संघटनांना भाग पाडले. संघटनांनी काही मुद्यांवर सहमती दर्शवत संप पुढे ढकलला होता. दरम्यान, या बैठकीत बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.

कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव आणि वेतनवाढ तसेच विलिनीकरणाचे परिणाम आणि यातून होणारे खासगीकरण याला विरोध करण्यासाठी देशभरातील बॅंक कर्मचारी संप करतील, असे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. 
....... 
बॅंक कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार गंभीर नाही. नवी भरती बंद असून विलिनीकरणामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. विलिनीकरणाऐवजी बॅंकांना मजबूत करून त्यातील कर्मचाऱ्यांचे हित जपणे आवश्‍यक आहे. 
देवीदास तुळजापूरकर, महासचिव, 
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against the merger Bank employees on strike