दोन खातेदारांचा २४ तासांत मृत्यू: पीएमसी बॅंक गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

बॅंकेत ठेवी अडकल्याचा मानसिक धसका

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.

फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बॅंकेतून रक्कम काढण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल मित्रांशी चर्चाही केली होती. त्यांचा मंगळवारी (ता. १५) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. त्यापूर्वी, सोमवारी संजय गुलाटी (वय ५१) या ठेवीदाराचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. पीएमसी बॅंकेत त्यांच्या तब्बल ९० लाखांच्या ठेवी 
अडकल्या आहेत.

ओशिवरा येथे राहणारे गुलाटी जेट एअरवेजमध्ये कामाला होते. कंपनी बंद पडल्याने त्यांची नोकरी गेली होती. त्यातच पीएमसी बॅंकेत तब्बल ९० लाखांच्या ठेवी अडकल्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले होते. या प्रकरणाच्या निषेधातील मोर्चात सहभागी होण्यासाठी ते सोमवारी दक्षिण मुंबईत गेले होते. त्यांचे ८० वर्षांचे वडीलही सोबत होते. तेथून घरी आल्यावर जेवताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 
गुलाटी यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप अन्य ठेवीदारांनी केला आहे. 

‘पैसे बुडाल्याची भीती’
नोकरी गेल्यामुळे ते तणावाखाली होते. त्यात पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहारामुळे आणखी भर पडली होती. 
या बॅंकेत ठेवलेले आपले पैसे कधीच परत मिळणार नाहीत, अशी भीती त्यांना वाटत होती, असे त्यांच्या पत्नी बिंदू गुलाटी यांनी सांगितले. आमच्या विशेष मुलाला वेगळ्या प्रकारचे शिक्षण द्यावे लागते; त्याची फी भरण्यासाठी आम्ही पैशांची जमवाजमव करीत होतो, असेही त्या म्हणाल्या. या बॅंकेत आमच्या ९० लाखांच्या ठेवींसह नातवाच्या नावे रिकरिंग खातेही होते, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. 

बॅंक संकटात
या प्रकरणी पीएमसी बॅंकेचे माजी अध्यक्ष वरियाम सिंग आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस अटकेत आहेत. बॅंकेने कर्जे दिलेले एचडीआयएल ग्रुपचे प्रवर्तक पिता-पुत्र राकेश व सारंग वाधवा यांनाही अटक झाली आहे. तब्बल ११ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बॅंकेतील चार हजार ४३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. एचडीआयएलला दिलेली बहुतांशी कर्जे बुडाल्याने बॅंक संकटात सापडली आहे.

उपाय तोकडेच
पीएमसी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात निर्बंध घातल्याने ठेवीदारांना मर्यादित रक्कम काढण्याची परवानगी आहे. सोमवारी ही मर्यादा ४० हजारांपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे आता ७७ टक्के खातेदार बॅंकेतील आपली सर्व रक्कम काढू शकतील, असे सांगितले जाते. आधी ही मर्यादा फक्त एक हजार रुपये होती, नंतर ती १० हजार व २५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली होती. या बॅंकेत ठेवीदारांचे ११ हजार कोटी रुपये अडकल्यामुळे सर्वत्र निदर्शने सुरू आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विनंती केल्यावर रिझर्व्ह बॅंकेने ही मर्यादा वाढवली; मात्र गुलाटी यांचे निधन झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेचे हे उपाय तोकडेच असल्याचे खातेदार बोलून दाखवत आहेत.

डॉ. बिजलानी यांची आत्महत्या
पीएमसी बॅंकेत एक कोटीपेक्षा अधिक रक्‍कम अडकलेल्या वर्सोवा येथील डॉ. योगिता बिजलानी यांनीही रात्री आत्महत्या केली; मात्र बॅंकेतील रक्‍कम न मिळाल्याने बिजलानी यांनी आत्महत्या केली नसून कौटुंबिक समस्येमुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संचालक, लेखापरीक्षकांची लवकरच चौकशी
पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील ४३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा इतर संचालक व लेखापरीक्षकांची लवकरच चौकशी करणार आहे. या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबद्दल आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two account holders killed in 2 hours: PMC Bank misconduct