सध्याची आर्थिक स्थिती भीषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

बाजारातील वस्तूंच्या मागणीमधील प्रचंड घट, बिगरबॅंकिंग वित्त संस्थांमधील रोकड संकट यांसारख्या परिणामांमुळे मंदीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बड्या संस्थांनी विकासदराचा अंदाज घटवला आहे. 

मुंबई: बाजारातील वस्तूंच्या मागणीमधील प्रचंड घट, बिगरबॅंकिंग वित्त संस्थांमधील रोकड संकट यांसारख्या परिणामांमुळे मंदीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बड्या संस्थांनी विकासदराचा अंदाज घटवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गोल्डमन सॅश या संस्थेनेही भारतातील सद्य आर्थिक स्थिती २००८ मधील महामंदीच्या तुलनेत भीषण असल्याचे मत व्यक्त केले आहे. गोल्डमन सॅशच्या अर्थतज्ज्ञ प्राची मिश्रा यांनी मंदीची स्थिती दीर्घकाळ राहील, अशी भीती व्यक्त केली आहे. 

वर्ल्डबॅंक, नाणेनिधी, रिझर्व्ह बॅंक यांच्यापाठोपाठ गोल्डमन सॅशनेसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज ६ टक्‍क्‍यांपर्यंत घटवला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये आयएल अँड एफएस ही कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर बिगर बॅंकिंग वित्त सेवा क्षेत्रात आर्थिक संकट निर्माण झाले. त्याचा परिणाम बाजारातील पतपुरवठ्यावर झाला आणि वस्तूंचा खप कमी होऊ लागला. जानेवारी २०१८ पासून देशांतर्गत वस्तूंच्या मागणीत झपाट्याने घसरण झाल्याचे दिसून येते, असे मिश्रा यांनी सांगितले. 

विकासदर कमी होण्यात वस्तूंचा खप रोडावणे हे सर्वात मोठे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र पतधोरणातील व्याजदरात घट, कंपनी करातील कपात यांसारख्या विकासाला पोषक उपाययोजनांमुळे दुसऱ्या सहामाहीत विकासचक्र वेग घेईल, असा आशावाद मिश्रा यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The current financial situation is tought