माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

मुंबईः प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे मंगळवारी (ता. 30) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्‍चात पत्नी ज्योत्स्ना बापट आणि मुलगी कनक असा परिवार आहे. 2015 पासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर कार्यकारी संचालक म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करत होते. गोकर्ण यांच्या निधनावर अर्थ मंत्रालयाकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे.

तीन दशकांहून अधिक काळ विविध संस्थांमध्ये अर्थतज्ज्ञाची भूमिका बजावणारे गोकर्ण यांनी अभ्यासू आणि संशोधन वृत्तीतून वेगळी ओळख निर्माण केली होती. गोकर्ण 24 नोव्हेंबर 2009 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत डेप्युटी गव्हर्नर होते. या काळात त्यांनी पतधोरण, भांडवली बाजार, विमा आदी क्षेत्रात संशोधन केले. सूक्ष्म आर्थिक घडामोडींबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांना मान मिळाला होता. रिझर्व्ह बॅंकेनंतर त्यांनी 2015 मध्ये केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर आंतररराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांचे प्रतिनिधीत्व केले. याशिवाय ब्रुकिंग इन्स्टिट्युशन इंडिया सेंटर येथे संचालक (संशोधन), स्टॅंडर्ड अँड पुअर्स या संस्थेत मुख्य अर्थतज्ज्ञ आणि क्रिसिलमध्ये कार्यकारी संचालक व मुख्य अर्थतज्ज्ञ अशी गोकर्ण यांची कारकीर्द राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कुशलपणे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थतज्ज्ञाला देश मुकला अशा शब्दात अर्थ मंत्रालयाने गोकर्ण यांना आदरांजली वाहिली.

सुबीर गोकर्ण यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. नाणेनिधीच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
- डेव्हिड लिप्टन, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, "आयएमएफ'

गोकर्ण यांच्यासारखा एका हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा अर्थतज्ज्ञ, सहकारी गमावल्याचे प्रचंड दु:ख आहे.
- शमिका रवी, सदस्य, पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती
----
अल्प परिचय
नाव : सुबीर विठ्ठल गोकर्ण
जन्म : 3 ऑक्‍टोबर 1959, मुंबई
शिक्षण : सेंट झेविअर महाविद्यालय, मुंबई.
अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स
अर्थशास्त्रात डॉक्‍टरेट, केज वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी, अमेरिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex deputy governor subir gokarn passes away