गुंतवणूकदारांना 624 व्होल्ट्‌सचा झटका ! शेअर बाजारात मोठी घसरण

गुंतवणूकदारांना 624 व्होल्ट्‌सचा झटका ! शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 623.75 अंशांची घसरला आणि 36 हजार 958.16 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 183.80 अंशांच्या घसरणीसह 10 हजार 925.85 वर बंद झाला. या पडझडीत जबरदस्त झटका लागलेल्या गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान झाले. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 10 टक्के वृद्धीसह निर्देशांकांची पडझड काही प्रमाणात रोखली. बकरी ईद निमित्त सार्वजनिक सुट्टी मुळे सोमवारी (ता.12) भांडवली बाजार बंद होते.

मंदीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी औद्योगिक संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सरकारकडून मंदी दूर सारण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. आज सकाळपासून गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. येस बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचडीएफएसी, मारुती, टाटा स्टील,एलअँडटी आदी शेअर मोठ्या प्रमाणात घसरले. बलाढ्य शेअरची घसरण सुरू असताना दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला मागणी दिसून आली. येत्या दीड वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्याचे आश्‍वास कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भागधारकांना दिल्यामुळे आज त्याचे सकारात्मक पडसाद शेअरवर उमटले. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 9.72 टक्‍क्‍यांनी वधारला. याशिवाय सन फार्मा आणि पॉवरग्रीड हे दोन शेअर तेजीसह बंद झाले.

अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या वादामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे हॉंगकॉंग, अर्जेंटिना आदी भांडवली बाजारांमध्ये चौफेर विक्री झाल्याचे सेंट्रम ब्रोकिंगचे मुख्य विश्‍लेषक जग्गनधाम थुनुगुंटला यांनी सांगितले. दरम्यान कच्च्या तेलाच्या भावात मंगळवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली. युरोपातील बहुतांश बाजार नकारात्मक व्यवहार करत होते.
---------
पडझडीमागील कारणे
मंदीचा वाढता प्रभाव, सरकार हतबल
जूनमधील औद्योगिक उत्पादन 2 टक्के
अर्जेंटिनामधील चलन संकट
अमेरिका-चीन ताणलेला व्यापारी संघर्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com