संपाने बॅंकेचे व्यवहार कोलमडले 

संपाने बॅंकेचे व्यवहार कोलमडले 

मुंबई: केंद्र सरकारच्या प्रस्तावित बॅंक एकत्रीकरणाच्या विरोधासाठी सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाने मंगळवारी (ता. 22) बॅंकिंग व्यवहार ठप्प पडले. सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन राष्ट्रीय संघटनांनी या संपाची हाक दिली होती. त्यामध्ये तीन लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. यामुळे देशभरातील बॅंकिंग सेवेवर परिणाम झाला. 

"ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन' आणि "बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया' या दोन संघटनांनी संपाची हाक दिली होती. या संपाला "ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन'सह इतर कामगार संघटनांनी पाठिंबा दिला होता. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक वगळता सार्वजनिक क्षेत्रातील इतर बॅंकांच्या कामकाजाला संपाचा मोठा फटका बसला.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बॅंकांचे एकत्रीकरण करून त्यातून चार बॅंका करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित एकत्रीकरणाला कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे बॅंकांमध्ये आलेले धनादेश पुढील प्रक्रियेसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडे पोहचू शकले नाहीत. बॅंकांमध्ये विलीनीकरण किंवा एकत्रीकरणाचा मुद्दा सरकार रेटू पाहत असून यामुळे बुडीत कर्ज वसुलीचा मुद्दा दुर्लक्षित झाला आहे. बॅंकिंग सेवेचा विस्तार आवश्‍यक असताना एकत्रीकरणामुळे बॅंकांच्या शाखांवर गंडांतर येईल. हे धोरण चुकीचे आणि अनावश्‍यक असल्याचे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी सांगितले. 

राज्यातील 40 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग 
महाराष्ट्रातील जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. मुंबईतील आझाद मैदानात जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बॅंकांच्या एकत्रीकरणामुळे किमान पाच हजार शाखा बंद होतील, अशी भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. या वेळी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे देवीदास तुळजापूरकर, एन. शंकर, अनिल प्रभू, प्रल्हाद पाटील, संदीप करमरकर, रत्नाकर वानखेडे आदी उपस्थित होते. 

देशभरात परिणाम 
आजच्या संपाचा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये परिणाम दिसून आला. बेंगळूरु, चेन्नई, पटना, कोलकाता आदी शहरांमधील बॅंकिंग व्यवहार ठप्प होते. मध्य प्रदेशमधील 20 हजार कर्मचारी संपात सहभागी झाले. ज्यामुळे या राज्यातील सात हजार 400 पैकी चार हजार 800 शाखांच्या कामकाजावर परिणाम झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com