तरुण वयातील निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

प्रा. दीपाली चांडक
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

जवळपास आयुष्याची 40 वर्षे मेहनत करून पै पै गोळा करत, आनंदाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, उत्पन्नातून बचत करत, स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या चांगल्या दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे आजच्या काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरतेच्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात तरुणवर्गाला निवृत्तीनंतरच्या आनंदी दिवसांसाठी आजपासूनच बचत करण्याचे महत्त्व पटलेले आहे.

जवळपास आयुष्याची 40 वर्षे मेहनत करून पै पै गोळा करत, आनंदाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, उत्पन्नातून बचत करत, स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या चांगल्या दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे आजच्या काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरतेच्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात तरुणवर्गाला निवृत्तीनंतरच्या आनंदी दिवसांसाठी आजपासूनच बचत करण्याचे महत्त्व पटलेले आहे.

महागाईचा वाढता दर बघता नुसतेच बचत करून चालणार नाही; आपणास हवी असलेली भांडवलवृद्धी हवी असेल तर योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय निवडावे लागतील. योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडण्यासाठी गुंतवणुकीशी निगडित सर्वच घटकांचा एकत्रित आणि विचारपूर्वक अभ्यास करणे आवश्‍यक आहे. जसे- वय, जबाबदारी, जोखीम स्वीकारण्याची ताकद, नियमित बचतीचे प्रमाण इत्यादी.

आज सरासरी 100 पैकी 90 तरुण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांना समोर ठेवून प्रामुख्याने पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करताना दिसतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी योजना असून, पूर्णपणे मूळ भांडवल परत मिळण्याच्या हेतूने जोखीमरहित, तसेच करसवलत मिळवून देणारी असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांत प्रसिद्ध आहे; परंतु जर बचतीचा मोठा भाग पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतविला असेल, तर महागाईचा वाढता दर भरून काढण्यासाठी केलेली ही गुंतवणूक पूरक ठरत नाही. कारण की पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा परतावा हा कमी आहे. खालील काही विशिष्ट कारणांमुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात फक्त आणि फक्त पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक केलेली योग्य ठरत नाही.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर मिळणारा परतावा हा गेल्या बऱ्याच वर्षांपासून सातत्याने कमी होताना दिसतो. जसे- 1986 मध्ये जवळपास 12 टक्के परताव्याचा दर होता आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 2016 मध्ये जवळपास 8.6 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झालेला दिसतो. सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावरील परतावा प्रत्येक वर्षाच्या सरकारी रोख्याशी निगडित केला आहे. तो प्रत्येक वर्षी बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामधील गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावयाची असते. म्हणजे दीर्घ मुदतीसाठी. गुंतवणुकीच्या नियमानुसार जसजशी गुंतवणुकीची मुदत वाढत जाणार तसतसे त्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा वाढत जाणार. उदाहरणार्थ इक्विटीमधील गुंतवणूक दीर्घ मुदतीची असून, मिळणारा परतावाही इतर पर्यायांपेक्षा जास्त असतो; परंतु पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या बाबतीत नेमके उलटे होते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे दीर्घ मुदतीसाठी असूनही, दीर्घ मुदतीसाठी असणाऱ्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे कमी परतावा देणारे आहे.
मुख्यत: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे करसवलतीच्या लाभासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास प्रेरित होतात.

खरेतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा जोखीम न स्वीकारू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नक्कीच उत्तम असा पर्याय आहे; परंतु जे गुंतवणूकदार, तरुण वयातच निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक नियोजनाचा विचार करतात त्यांनी नक्कीच हे लक्षात घेतले पाहिजे, की तरुण वयात जोखीम स्वीकारण्याचे प्रमाण/ताकद इतर वयाच्या गुंतवणूकदारांच्या मानाने जास्त असते. अशा तरुण गुंतवणूकदारांनी निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी स्वतःचे वय लक्षात घेत अभ्यासपूर्वक स्वतःची जोखीम स्वीकारण्याचा अंदाज घेऊन, जबाबदाऱ्याचे भान ठेवत दीर्घ कालावधीसाठीच्या जास्त परतावा देणाऱ्या वाढत्या महागाईच्या दराला मारक ठरणाऱ्या, गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला समोर ठेवत, भांडवलवृद्धीत मदत करणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्‍यक आहे. कारण शेवटी मेहनत तुमची, उत्पन्न तुमचे, बचत तुमची, उद्दिष्टे तुमची, गुंतवणूक तुमची आणि त्यातून होणारी भांडवलवृद्धीही तुमचीच!

Web Title: retirement plan