रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
बुधवार, 20 जुलै 2016

क्‍लिव्हलॅंड - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती. 

अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळणे हा आपला बहुमान असल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली. "मी कष्ट करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही,‘ असे आश्‍वासन ट्रम्प यांनी घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिले. ट्रम्प हे अध्यक्षीय उमेदवारीचा यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव उद्या (गुरुवार) स्वीकारतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, या अधिवेशनामध्ये बोलताना विविध रिपब्लिकन नेत्यांनी आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर तिखट हल्ले चढविले. न्यू जर्सी राज्याचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांनी क्‍लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी वापरलेल्या खासगी इमेल अकाऊंटसंदर्भातील उघडकीस आलेल्या माहितीवरुन त्यांना लक्ष्य केले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये क्‍लिंटन या "अत्यंत निष्काळजीपणे‘ वागल्याचा ठपका येथील "एफबीआय‘ने ठेवला आहे. यावरुन ख्रिस्ती व अन्य रिपब्लिकन नेत्यांनी क्‍लिंटन यांच्यावर टीका केली.

ट्रम्प यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार, हे काही महिन्यांपूर्वीच निश्‍चित झाले होते. मात्र आज यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. ट्रम्प व क्‍लिंटन यांच्यामधील लढत आता अधिक टोकदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.