
रोख स्वरुपातील व्यवहारांना एक उत्तम आणि सुलभ पर्याय म्हणून डिजीटल ट्रान्झेक्शनचा हा पर्याय ग्राहकांना सोपा वाटतो.
नवी दिल्ली : भारतात डिजीटल व्यवहारांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. रोख स्वरुपातील व्यवहारांना एक उत्तम आणि सुलभ पर्याय म्हणून डिजीटल ट्रान्झेक्शनचा हा पर्याय ग्राहकांना सोपा वाटतो. भारतात नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात आलं. लोकांनी अधिकाधिक कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सध्या अनेक लोक या प्रकारच्या व्यवहारांना प्राधान्य देताना दिसतात. कार्डद्वारे किंवा डिजीटल पद्धतीने होणाऱ्या या व्यवहारांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. याबाबतचा सर्व्हेवर आधारित एक रिपोर्ट जाहिर झाला आहे.
हेही वाचा - Stock Market: भांडवली बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्समध्ये 251.51 तर निफ्टीत 60 अंशांनी घट
एक्सेंचर या कंपनीने हा सर्व्हेवर आधारित रिपोर्ट दिला आहे. या दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 2023 पर्यंत 66.6 अब्ज ट्रान्झेक्शन्स हे रोख स्वरुपातून डिजीटल स्वरुपामध्ये परावर्तीत होणार आहेत. यांची किंमत जवळपास 270.7 अब्ज डॉलर इतकी होते. इतकेच नव्हे, तर यात सातत्याने वाढ होत राहून पुढे 2030 पर्यंत याची किंमत 856.6 अब्ज डॉलर होणार असल्याचा अंदाज आहे, असं हा रिपोर्ट सांगतो.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करण्यात आला. यावेळी रोख व्यवहारांपेक्षा डिजीटल पद्धतीने पेमेंट करण्यावर लोकांचा भर वाढलेला दिसून आला. यामुळे ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेता बँकांनाही आपली पेमेंट सिस्टीम आधुनिक करण्याची गरज भासत आहे.
हेही वाचा - सरकारला मिळतो कर, पण सामान्यांच्या मागे लागते घरघर
हा रिपोर्ट 120 पेमेंट्स एक्झीक्यूटीव्हच्या सर्व्हेवर आधारीत आहे. बँका नसलेल्या डिजिटल-पेमेंटची सुविधा देणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बँका यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. या रिपोर्टसाठी या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, भारत, नॉर्वे, सिंगापूर, थायलंड, इंग्लड आणि अमेरिका या देशांमधील मार्केट्सचा अभ्यास केला गेला आहे.