"बीएसएनएल'च्या स्वेच्छानिवृत्तीसाठी 70 हजार कर्मचारी इच्छुक 

"बीएसएनएल'च्या स्वेच्छानिवृत्तीसाठी 70 हजार कर्मचारी इच्छुक 

नवी दिल्ली, ता. 11 (पीटीआय) : आर्थिक अडचणीत असलेल्या "भारत संचार निगम लिमिटेड' (बीएसएनएल)ने जाहीर केलेल्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) आतापर्यंत सुमारे 70 हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. 4 नोव्हेंबरपासून बीएसएनएलची "व्हीआरएस' योजना सुरू झाली असून, यासाठी 3 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

"बीएसएनएल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार म्हणाले, "बीएसएनएल'च्या "व्हीआरएस' योजनेला देशभरातील कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 70 हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले असून आणखी अर्ज येण्याची आशा आहे. "सध्या "बीएसएनएल'मध्ये एकूण दीड लाख कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा सर्वोत्तम पर्याय दिला असून, "बीएसएनएल'च्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे. कंपनी वेतनावरील सात हजार कोटी रुपयांच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. केंद्र सरकारने "बीएसएनएल' आणि "एमटीएनएल'साठी 69 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले होते. 

आकर्षक प्रस्तावाने कर्मचाऱ्यांचा ओढा वाढला 

"बीएसएनएल'ने सादर केलेल्या स्वेच्छनिवृत्ती योजनेनुसार, वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणाऱ्या रकमेत 25 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून दिला जाणार आहे. सेवेत कार्यरत वर्षांच्या 35 दिवसांइतकी आणि शिल्लक राहिलेल्या सेवेच्या वर्षांतील 25 दिवसांच्या वेतनाइतकी रक्कम (निवृत्तिवेतन वगळून) सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय 56 वर्षे असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा 40 महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी लागू असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com