बॅंकांना ७१ हजार कोटींचा गंडा

Banking fraud
Banking fraud

नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारांनी बॅंकिंग क्षेत्र ढवळून निघाले असून, मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) देशभरात ७१ हजार ५०० कोटी रुपयांच्या बॅंक गैरव्यवहारांची नोंद झाली आहे. बॅंकिंग गैरव्यवहारांसंदर्भातील ६ हजार ८०० प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशिलात म्हटले आहे. 

२०१७-१८ या वर्षात ५ हजार ९१६ प्रकरणांमध्ये ४१ हजार १६७.०३ कोटी रुपयांचे बॅंक गैरव्यवहार झाले होते. मागील आर्थिक वर्षात या गैरव्यवहारांचे मूल्य ७३ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या ११ वर्षांत आर्थिक फसवणुकीच्या तब्बल ५३ हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये २ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत (पीएनबी) नीरव मोदी याने केलेल्या सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने बॅंकिंग व्यवस्थेतील कच्चे दुवे समोर आले होते. त्यानंतरही बॅंकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सुरक्षित बॅंकिंग व्यवहारांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मागील आर्थिक वर्षात वाणिज्य बॅंका आणि वित्त संस्थांमधील ६ हजार ८०१ आर्थिक गैरव्यवहारांची नोंद झाली. यातून ७१ हजार ५४२ कोटी ९३ लाखांची फसवणूक झाल्याचा तपशील रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारात दिला आहे. 
प्रामुख्याने हिरे व दागिने, निर्यात, कृषी यांसारख्या १३ औद्योगिक क्षेत्रांमधून बॅंकांमधील फसवणुकीच्या घटनांची नोंद झाली. बॅंकांच्या १०० बड्या गैरव्यवहारांमध्ये केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआय, सक्तवसुली संचालनालय, गंभीर गुन्हे तपास पथक आदी यंत्रणा चौकशी करीत आहेत.

आर्थिक फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी बॅंकांनी कठोर नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना दक्षता आयोगाने बॅंकांना दिल्या आहेत. नुकताच ‘सीबीआय‘ने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोषारोप ठेवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com