आगामी पाच वर्षांत कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल ?

अभिजित भावे
सोमवार, 23 एप्रिल 2018

गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. काळानुरूप त्यांच्या परताव्यात होणारे बदलही वेगवेगळे असतात. त्यामुळेच सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचं योग्य मिश्रण केल्यास तुम्हाला तुलनेनं कमी जोखमीत रास्त परतावा मिळू शकतो.

गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. काळानुरूप त्यांच्या परताव्यात होणारे बदलही वेगवेगळे असतात. त्यामुळेच सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचं योग्य मिश्रण केल्यास तुम्हाला तुलनेनं कमी जोखमीत रास्त परतावा मिळू शकतो.

एखाद्या विशिष्ट गुंतवणूक प्रकारावर लक्ष केंद्रित न करता आपण सर्व प्रकारच्या गुंतवणूक प्रकारांचा आढावा घेत, आगामी पाच वर्षांच्या गुंतवणूक आराखड्याकडे दृष्टिक्षेप टाकूया.

पायाभूत सुविधांच्या पाठबळामुळं आणि राष्ट्रीय विकास दरातील वाढीमुळं भारताच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे उद्योगविश्वासाठी सकारात्मक वातावरण आहे आणि म्हणूनच इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीसाठी आता सुवर्णसंधी आहे.

इक्विटीतून अधिक परतावा
कार्व्ही इंडिया या गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या ‘वेल्थ इंडिया २०१७’ या अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत इक्विटी (शेअर बाजारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केली जाणारी गुंतवणूक) या प्रकारात वार्षिक वृद्धी (सीएजीआर) ही २१ टक्के असू शकेल. इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारातून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा इक्विटीमधून मिळणारा परतावा हा किती तरी जास्त राहण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी गुंतवणूकदारांनी ‘इक्विटी’च्या एकाच प्रकारात गुंतवणूक न करता वेगवेगळ्या प्रकारांत केली पाहिजे. उदाहरणार्थ शेअर्स, म्यच्युअल फंड आदी. नेहमीच्या शेअर बाजारात नोंदणी नसलेले; पण चांगला परतावा देणारे शेअर किंवा ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड’ आदी प्रकारांचाही विचार केला पाहिजे, असे माझं मत आहे.

एखाद्या चांगल्या पोर्टफोलिओमध्ये नियमित उत्पन्न देणाऱ्या प्रकाराचाही समावेश योग्य प्रमाणात असला पाहिजे. बाँड्‌समधील गुंतवणूक हा त्यातलाच एक पर्याय. मात्र, बाँड्‌समधील गुंतवणुकीतून होणाऱ्या परताव्यात वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे. सध्या मिळत असलेले व्याजदर लक्षात घेता मिश्र स्वरूपाचे बाँड फंड हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

सोन्याचा छोटासा हिस्सा
सोनं हासुद्धा एक गुंतवणूक पर्याय विचारात घ्यायला हरकत नाही. कारण जेव्हा शेअर बाजारात मंदीचं वातावरण असतं, तेव्हा सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळेच आपल्या पोर्टफोलिओमधील एक छोटासा हिस्सा सोन्याच्या गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. त्यासाठी  गोल्ड इटीएफ फंड किंवा सोव्हरिन गोल्ड बाँड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, सोन्यातली गुंतवणूक ही तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असायला नको.

रिअल इस्टेटमध्येही संधी
भारतीयांचा स्थावर मालमत्तेत असलेला रस लपून राहिलेला नाही. त्यातच रिअल इस्टेटमध्ये सध्या असलेल्या मंदीमुळे किमती बऱ्याच खाली आलेल्या आहेत. अशा वेळी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक चांगला परतावा देणारा प्रकार असेल. सद्यः परिस्थितीत किफायतशीर दरातील घरं, व्यापारीमूल्य असलेली स्थावर मालमत्ता आणि विद्यार्थ्यांसाठीच्या रहिवासाच्या मालमत्ता अशा नव्या पर्यायांचा गुंतवणुकीच्या संधी म्हणून विचार करायला हवा.

एकाच ठिकाणी किंवा एकाच गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करू नका, असा रास्त सल्ला नेहमी दिला जातो. त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा आराखडा बनवताना गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करणंच योग्य आणि जोखीम कमी करणारं असतं. त्यातही इक्विटी या प्रकाराला प्राधान्य देत डेट, रिअल इस्टेट आणि सोन्याचा समावेश केला पाहिजे.

(लेखक कार्व्ही प्रायव्हेट वेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijit Bhave article