मुकेश अंबानी जिओनंतर आता रियल इस्टेटमध्ये करणार क्रांती

सोमवार, 8 एप्रिल 2019

रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे विस्तृत वृत्त दिले आहे. हा रिलायन्स समूहाचा न भूतो न भविष्यति: अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. किंबहुना याचे स्वरुप ' एका प्रकल्पात अनेक प्रकल्प' असे असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत रिलायन्स एक आख्खं नवं शहरच नव्या मुंबईजवळ उभारणार आहे. सिंगापूरच्या धर्तीवर या मेगासिटीचे निर्माण करण्यात येणार आहे.

या मेगासिटीमध्ये स्वतंत्र विमानतळ, बंदर, सीलिंक (सागरी पूल) अशा सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तयार झाल्यानंतर या मेगासिटीमध्ये हजारो व्यवसाय आणि तब्बल 5 लाख रहिवासी राहू शकणार आहेत.

अतिभव्य प्रकल्पासाठी पुढील दशकात 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. अंबानींच्या या भव्य प्रकल्पामुळे भारतातील रियल इस्टेटचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. ज्याप्रमाणे 2016 मध्ये जिओ बाजारात आल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडून येत आमुलाग्र बदल झाला. तसेच काहीसे रियल इस्टेटच्या क्षेत्रात अंबानींच्या मेगासिटीमुळे होणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अर्थात दक्षिण मुंबईच्या तुलनेत अंबानींच्या मेगासिटीचे दर स्वस्त आणि सुविधा मात्र अत्याधुनिक असणार आहेत. त्यामुळेशहरी भागातील पायाभूत सुविधांचे चित्रच बदलून जाईल. मुंबईला पर्यायी शहर म्हणून ही मेगासिटी उभी राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील बरीचशी लोकसंख्या या मेगासिटीत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. कारण येथील जागांचे दर मुंबईपेक्षा स्वस्त असणार आहेत. स

र्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिलायन्स फक्त ही मेगासिटी उभीच नाही करणार तर या नव्या शहराचे व्यवस्थापनसुद्धा करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन यंत्रणा उभारली जाणार आहे. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे ही कल्पना होती. नव्या मुंबईजवळ एक जागतिक दर्जाचे शहर उभे राहावे आणि त्या शहराला दक्षिण मुंबईशी रस्त्याने जोडण्यात यावे, अशी धीरूभाईंची ईच्छा होती.