एअर इंडियाला हवी विक्रीत सूट!

रविवार, 19 मे 2019

मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

एअर इंडियाची ही इमारत भाड्यापोटी दरवर्षी जवळपास १०० कोटी रुपये तिजोरीत जमा करते; मात्र कंपनी अडचणीत आल्याने ही मालमत्ता विकून रक्‍कम उभारण्याचा निर्णय होताच ही इमारत विकत घेण्यासाठी राज्य सरकारने उत्सुकता दाखवली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टलाही ही इमारत घेण्यात रस होता; मात्र विक्रीसाठी प्रत्यक्ष निविदा काढल्यावर राज्य सरकारने तसेच जीवन विमा निगमने विक्रीसाठी रिंगणात उडी घेतली. राज्य सरकारने ही इमारत १४०० कोटी या किमतीला विकत घेण्याची तयारी दाखवली. ही इमारत १६०० कोटींना विकली जावी अशी एअर इंडियाची अपेक्षा वजा अट होती; मात्र राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी १४०० कोटींची किंमत ही सर्वाधिक बोली असल्याचे नागरी उड्डाण खात्याचे सचिव प्रदीप खरोला यांच्या लक्षात आणून दिले.

मुंबईतील सर्व कार्यालये एकाच इमारतीत?
राज्य सरकारची मुंबईभर पसरलेली कार्यालये २३ मजल्यांच्या दोन लाख २० हजार चौरस फूट पसरलेल्या या इमारतीत हलवणे कार्यक्षमता वाढवणारे ठरेल. तसेच भाड्यादाखल दिला जाणारा खर्चही वाचेल, असा विचार सरकारचा आहे. या इमारतीची जागा एअर इंडियाला राज्य सरकारने ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती. सरकारने काही विशिष्ट वापरासाठी दिलेली जागा त्या कामासाठी न वापरता विकली जाणार असेल, तर नियमानुसार त्यासाठी काही मोबदला राज्याच्या तिजोरीत जमा करावा लागतो. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्‍कम माफ करावी असा एअर इंडियाचा प्रस्ताव आहे. सुमारे १५० कोटी त्यानुसार माफ करावे लागतील; मात्र राज्य सरकारने त्यास नकार दर्शवला आहे.