'इन्फोसिस'विरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; 'सीईओ' पारेख यांच्यावर आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नियमांनुसार कारवाई होणार 
हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीने एक पत्रक जारी करून नियमांनुसार कारवाई होईल, असे म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीच्या लेखापरीक्षण समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या असून, कंपनीच्या व्हिसलब्लोर पॉलिसीअंतर्गत त्यावर समाधान शोधले जाईल, अशी माहिती इन्फोसिसने दिली आहे. 

बंगळुरू : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्फोसिस' या कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात कंपनीच्याच कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाकडे तक्रार केली आहे. "इन्फोसिस'ने ताळेबंदामध्ये नियमबाह्य पद्धतीने फेरबदल केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्या गटाने केला आहे. या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारीख यांच्यावर आरोप केले आहेत. 

लेखापरीक्षणामध्ये नियम डावलण्यात आल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांच्या गटाने केला आहे. याप्रकरणी ईमेल आणि रेकॉर्डिंगसारखे सबळ पुरावे असून संचालक मंडळाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. व्हेरिझोन, एबीएम ऍमरो आणि जपानमधील संयुक्त उद्यम या व्यवहारांमध्ये महसूल दाखवताना नियमांचा भंग केला आहे. मोठ्या व्यवहारांमध्ये अनियमितता आणि हजारो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लेखापरीक्षकांनी तपासणी केल्यास महसुलातील गडबड आणि त्यातून मिळवलेल्या फायद्याची माहिती उघड होईल, असा दावा या कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, 2017 आणि 2018 मध्येही कंपनीतील सुशासनासंदर्भात जागल्यांनी आवाज उठविला होता. या आरोपात तथ्य आहे का, हे शोधण्यासाठी सेबीने एक समितीही नियुक्त केली होती. 

नियमांनुसार कारवाई होणार 
हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीने एक पत्रक जारी करून नियमांनुसार कारवाई होईल, असे म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीच्या लेखापरीक्षण समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या असून, कंपनीच्या व्हिसलब्लोर पॉलिसीअंतर्गत त्यावर समाधान शोधले जाईल, अशी माहिती इन्फोसिसने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations employees made against Infosys Salil Parekh Nilanjan Roy