ई-कॉमर्स कंपन्या सुसाट!; सहा दिवसांत 19 हजार कोटींची कमाई

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनमध्ये रस्सीखेच
फ्लिपकार्ट आघाडीवर असून एकूण विक्रीत तब्बल 60 ते 62 टक्के हिस्सा आहे. त्याशिवाय फ्लिपकार्टच्या सहयोगी कंपन्या असलेल्या मायंत्रा आणि जेबॉंग यांचे विक्रीत 63 टक्के योगदान असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऍमझॉनच्या एकूण विक्रीत 22 टक्के वाढ नोंदवण्यात आली. ऍमेझॉनला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 500 शहरांमधील 99.4 टक्के पिनकोड्‌समधून ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या 15 हजार विक्रेत्यांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली. फ्लिपकार्टच्या "दि बिग बिलियन डेज'मध्ये नव्या ग्राहकांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
मुंबई : बाजारात बडे दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत असताना ऑनलाईन विक्रेत्यांची गाडी मात्र सुसाट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सणासुदीच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्सचा पाऊस पाडणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील सहा दिवसांत तब्बल 19 हजार कोटींचा गल्ला जमवल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. ई-कॉमर्सच्या विक्रीने मंदी प्रभावहीन ठरली आहे. 

ई-कॉमर्स बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन या दोन कंपन्यांचा सहा दिवसांच्या विक्रीत तब्बल 90 टक्के वाटा होता, असे बंगळूरुमधील रेडसीर कन्सल्टन्सी या संस्थेने अहवालात म्हटले आहे. नवरात्रीनिमित्त बहुतांश कंपन्यांनी ई-कॉमर्स मंचावर 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबर यादरम्यान सेलचे आयोजन केले होते. ज्यात ऍमेझॉनचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' आणि फ्लिपकार्टचा "दि बिग बिलियन डेज' या सवलत योजनांनी गेले सहा दिवस ई-बाजारपेठेत धुमाकुळ घातला होता.

सणासुदीच्या हंगामातील हा पहिलाच सेल होता. मंदीचा प्रभाव असूनही ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे रेडशीर कन्सल्टन्सीचे संस्थापक अनिल कुमार यांनी सांगितले. ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक स्तरावर 30 टक्के वाढ झाली. बड्या शहरांबरोबरच दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले, असे कुमार यांनी सांगितले. 

सर्वाधिक खपाच्या वस्तूंमध्ये मोबाईल अव्वल ठरला आहे. एकूण विक्रीपैकी तब्बल 55 टक्के वाटा मोबाईल विक्रीचा होता. सणासुदीतील सवलतींसाठी ग्राहक वाट पाहत असल्याचे यातून दिसून येते, असे कुमार यांनी सांगितले. मोबाईलशिवाय ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फॅशनशी संबंधित वस्तू आणि कपडे यांची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली आहे. 

फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनमध्ये रस्सीखेच
फ्लिपकार्ट आघाडीवर असून एकूण विक्रीत तब्बल 60 ते 62 टक्के हिस्सा आहे. त्याशिवाय फ्लिपकार्टच्या सहयोगी कंपन्या असलेल्या मायंत्रा आणि जेबॉंग यांचे विक्रीत 63 टक्के योगदान असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऍमझॉनच्या एकूण विक्रीत 22 टक्के वाढ नोंदवण्यात आली. ऍमेझॉनला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 500 शहरांमधील 99.4 टक्के पिनकोड्‌समधून ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या 15 हजार विक्रेत्यांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली. फ्लिपकार्टच्या "दि बिग बिलियन डेज'मध्ये नव्या ग्राहकांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon, Flipkart sales generate Rs 19,000 crore in 6 days