'अॅमेझॉन' देणार 5000 भारतीयांना देणार रोजगार 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भारतात आमच्या व्यवसायाचा विस्तार करीत आहोत. या सेवा केंद्रांमुळे आम्हाला आमच्या प्रमुख(प्राइम) ग्राहकांना अधिक जलद वेगाने सेवा देणे शक्य होईल.

- अखिल सक्सेना

मुंबई : भारतात विस्तार करू पाहणारी ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझॉन इंडिया आता देशात सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीने ग्राहकांना आणखी जलद सेवा देण्यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 14 नवी गोदामे आणि सेवा केंद्रे सुरू करणार आहे. यामुळे अर्थातच कंपनीच्या साठवण क्षमतेत वाढ होईल आणि अनेक रोजगार उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे. 

या गोदामांच्या स्थापनेमुळे कंपनीच्या प्रमुख सदस्यांना अधिक जलद सेवा मिळू शकणार आहे. याशिवाय, विक्रेत्यांनादेखील आपली विविध उत्पादने सादर करता येतील. कंपनीकडून सणासुदीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळाची तरतूद केली जाते. परंतु या केंद्रांवरील रोजगारनिर्मिती ही स्वतंत्र असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.  

अॅमेझॉन इंडियाच्या कस्टमर फुलफिलमेंट विभागाचे अध्यक्ष अखिल सक्सेना यासंदर्भात बोलताना म्हणाले की, "आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भारतात आमच्या व्यवसायाचा विस्तार करीत आहोत. या सेवा केंद्रांमुळे आम्हाला आमच्या प्रमुख(प्राइम) ग्राहकांना अधिक जलद वेगाने सेवा देणे शक्य होईल."

यावर्षी सुरु होणाऱ्या सात गोदामांमध्ये मोठी उपकरणे आणि फर्निचर ठेवण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे. तसेच इतर तीन केंद्रांमार्फत कंपनी आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातदेखील विस्तार करु पाहत आहे. मात्र, या केंद्रांसाठी नेमकी किती गुंतवणूक केली जाणार आहे हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.
 
 

Web Title: amazon to recruit five thousand indians