अंकल सॅमचा ‘ड्रॅगन’ला दणका

पीटीआय
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

वॉशिंग्टन - अमेरिका-चीन या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये उडालेला व्यापारयुद्धाचा भडका इतक्‍यात शमणार नसल्याचे आज स्पष्ट झाले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून आयात होणाऱ्या आणखी २०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर १० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. ही शुल्कवाढ २४ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिका-चीन या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये उडालेला व्यापारयुद्धाचा भडका इतक्‍यात शमणार नसल्याचे आज स्पष्ट झाले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून आयात होणाऱ्या आणखी २०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर १० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. ही शुल्कवाढ २४ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 

याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘चीन व्यापारासाठी चुकीची धोरणे व तंत्र अवलंबत असून, ही धोरणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. चीनने आपली व्यापारपद्धत बदलावी तसेच, अमेरिकन कंपन्यांना योग्य वागणूक द्यावी, यासाठी आम्ही गेले काही महिने प्रयत्न केले. चीनला अनेक संधी दिल्या. मात्र, चीनने आपला हेकेखोरपणा सोडला नाही.’’ 

नव्याने चिनी उत्पादनांच्या आयातीवर सध्या आकारलेल्या १० टक्के शुल्कात डिसेंबर महिन्यापर्यंत उत्तरोत्तर वाढ करत ते २५ टक्‍क्‍यांवर नेले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेने यापूर्वी जुलै महिन्यात चीनच्या ५० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्काची आकारणी केली होती. त्यास चीनने जशास तसे उत्तर दिले होते. 

दरम्यान, व्यापारयुद्धावर चर्चेद्वारे तोडगा काढण्यात दोन्ही देश आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. या संदर्भात अमेरिकेच्या एका शिष्टमंडळाने नुकताच चीनचा दौरा केला होता. मात्र, यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

आपली चुकीची व्यापार पद्धत बदलण्यास चीन राजी नाही. नव्या शुल्कवाढीमुळे अमेरिकन कंपन्यांसोबत आता योग्य व न्याय्य व्यवहार होईल, अशी अपेक्षा असून, याला प्रत्युत्तर म्हणून चीनने कोणतेही पाऊल उचलले तर चीनच्या आणखी २६७ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

शुल्कवाढीतून यांना सूट
नव्या शुल्कवाढीतून अमेरिकेने सुमारे ३०० उत्पादने वगळली असून, यात स्मार्ट वॉच, ब्लुटूथ डिवाइस, बेबी कार सीट, सेफ्टी गियर, सायकल, हेल्मेटसारख्या वस्तू तसेच, कापड उद्योग, कृषी क्षेत्र तसेच, उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्‍यक रसायने यांचा समावेश आहे. 

चीनचे प्रत्युत्तर
बीजिंग - अमेरिकेने नव्याने केलेल्या शुल्क आकारणीला चीनने आज त्याच भाषेत उत्तर दिले आहे. अमेरिकेकडून आयात होणाऱ्या ६० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर करताना चीनच्या अर्थ मंत्रालयाने आगामी शुल्कवाढीला चीन जशास तसे उत्तर देईल, असा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America and Chin Business War