देशातील प्रत्येक बँकेची जबाबदारी मोदींची नाही: अमित शहा

पीटीआय
गुरुवार, 22 मार्च 2018

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या गैरव्यवहार बाहेर आल्यानंतर देखील नीरव मोदी अजून सरकारच्या हाती आलेला नाही असे सांगतानाच देशातील प्रत्येक बँकेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाही, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.  

नीरव मोदी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले,'' देशातील प्रत्येक बँकेची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेऊ शकत नाही. त्यासंबंधित प्रत्येक विभागाला  ती जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या नातेवाईकाने मेहनती शेतकऱ्यांचे पैसे हडप केले.  भ्रष्टाचाराविरोधात मोदी सरकार कठोर भूमिका घेत आहे. विरोधकांना आमच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता आलेले नाही. नीरव मोदी प्रकरणात भाजप नेत्याचा सहभाग असल्याचे राहुल गांधी यांनी सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी थेट राहुल गांधींना दिले. 

काँग्रेसच्या काळात आम्ही कोणतेही आरोप केले नव्हते. सरकारी तपास यंत्रणा असलेल्या कॅग आणि अन्य संस्थांच्या तपासातून काँग्रेस सरकारमधील गैरव्यवहार उघड झाले होते. शिवाय काही प्रकरणे जनहित याचिकेच्या माध्यमातून समोर आली. राहुल गांधी यांनी देखील नुसते आरोप न करता न्यायालयात जावे, असा सल्ला शहा यांनी दिला.

Web Title: Amit Shah slams Cong after CBI books Punjab CM's son-in-law for bank fraud