'बिटकॉइन'मुळे अमिताभ बच्चन 'करोडपती'

वृत्तसंस्था
बुधवार, 20 डिसेंबर 2017

जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 15,257 अमेरिकी डॉलरवर पोचले होते. म्हणजेच भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे 9 लाख 81 हजार रुपये आहे. परंतु, मूल्यवाढीचा हा फुगा असून, तो कधीही फुटण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त 8 रुपये म्हणजेच 0.003 डॉलर इतके होते.

मुंबई - मध्यंतरी "रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने कायम चर्चेत असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आणखी चर्चेत आणले आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. त्यातून बच्चन कुटुंबीयांना मोठा फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे. अडीचवर्षांपूर्वी बच्चन कुटुंबाने बिटकॉइनमध्ये 1.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचे मुल्य आता 110 कोटी रुपये झाले आहे. मात्र बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याचे बच्चन कुटुंबीयांकडून अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही.

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी 2015 मध्ये मेरीडियन टेक पीटीईमध्ये 1.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मेरीडियन टेक ही सिंगापूरची कंपनी असून वेंकट श्रीनिवास मीनावल्ली यांनी या कंपनीची स्थापना केली होती. गेल्या आठवडयात मेरीडियनच्या झिद्दू.कॉम या कंपनीला लाँगफिन कॉर्पने विकत घेतले. लाँगफिन कॉर्पची अमेरिकन शेअर बाजार नॅसडॅकमध्ये नोंदणी झाल्यानंतर दोन दिवसांनी हा व्यवहार झाला. लाँगफिनच्या शेअर्सचे मुल्य बुधवार ते सोमवार दरम्यान 1 हजार टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी जेव्हा झिद्दू.कॉम खरेदी करण्याचा करार झाला तेव्हा शेअर्सचे मुल्य 2500 टक्क्यांनी वाढले.

जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 15,257 अमेरिकी डॉलरवर पोचले होते. म्हणजेच भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे 9 लाख 81 हजार रुपये आहे. परंतु, मूल्यवाढीचा हा फुगा असून, तो कधीही फुटण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त 8 रुपये म्हणजेच 0.003 डॉलर इतके होते.

गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. आज एका बिटकॉइनचे मूल्य 15 हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्‍वाचे डोळे विस्फारले गेले. पण याचबरोबर धोक्‍याची घंटाही वाजली असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागणी आणि पुरवठा तत्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही वाढ म्हणजे एकप्रकारे फुगा असून, तो जोरात फुटूही शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. 

जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. विशेषत: जर्मनी आणि जपानने या चलनाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर त्याच्या मूल्यात मोठी वृद्धी झाली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. त्याचमुळे अर्थ मंत्रालयानेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही.

Web Title: Amitabh Bachchan rode the bitcoin wave and is now a cryptocurrency crorepati