आयफोनची विक्री घटल्याने टिम कुक यांच्या वेतनाला कात्री

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

सप्टेंबर 2016 मध्ये अॅपलने आपल्या व्यवसायाची वार्षिक आकडेवारी जाहीर केली होती. कंपनीचे उत्पन्न 8 टक्क्यांनी घसरुन 216 अब्ज डॉलरवर पोचले. यासोबतच, कंपनीचा कार्यान्वयन नफा 16 टक्क्यांनी घसरुन 60 अब्ज डॉलरवर पोचला.

न्यूयॉर्क - आयफोन बनविणाऱ्या अॅपल कंपनीने विक्रीचे उद्दिष्ट पुर्ण न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांच्या वेतनात 15 टक्के कपात केली आहे. 

कुक यांना गेल्यावर्षी कंपनीने 8.7 दशलक्ष डॉलरचे वेतन दिले होते. त्याअगोदरच्या वर्षात त्यांना 107 दशलक्ष डॉलरचे वेतन मिळाले होते. कुक यांना यंदा विक्री आणि नफा अशा दोन्ही बाबतीत कंपनीला आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आले आहे. आयफोनची विक्री घटल्यामुळे गेल्या 15 वर्षात पहिल्यांदा कंपनीच्या उत्पन्नात घट नोंदविण्यात आली. 

कंपनीच्या संचालक मंडळाने यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. यामुळे कुक यांच्यासह इतर अनेक अधिकाऱ्यांच्या वेतनाला कंपनीकडून कात्री लावण्यात आली आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये अॅपलने आपल्या व्यवसायाची वार्षिक आकडेवारी जाहीर केली होती. कंपनीचे उत्पन्न 8 टक्क्यांनी घसरुन 216 अब्ज डॉलरवर पोचले. यासोबतच, कंपनीचा कार्यान्वयन नफा 16 टक्क्यांनी घसरुन 60 अब्ज डॉलरवर पोचला.

Web Title: Apple cuts Tim Cook's pay 15% for missing sales goals