कतारकडून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले

कतारकडून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले

दुबई - आखातातील काही देशांनी निर्बंध लादल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने कतारने खासगी क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. 

पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासर बिन खलिफा अल-थानी यांनी कतारमधील मालवाहतूक क्षेत्रात कंपन्यांना आकारण्यात येणाऱ्या भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ही कपात पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे. मालवाहतूक क्षेत्रात नव्या गुंतवणूकदारांना एक वर्ष भाडे माफ करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी ठराविक मुदतीत परवानगी घेण्याची अट आहे. सरकारी मालकीची कतार डेव्हलपमेंट बॅंक औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी कंपन्यांकडून सहा महिन्यांपर्यंत कर्जाच हप्ते घेणार आहे. पंतप्रधानांनी सर्व सरकारी विभागांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे प्रमाण ३० वरून १००टक्‍क्‍यांवर नेण्याचे निर्देश दिले आहेत.  

अर्थव्यवस्थेतील वाढ कमी 
एप्रिल ते जून या तिमाहीत कतारच्या अर्थव्यवस्थेत केवळ ०.६ टक्के वाढ झाली. ही २००९-२०१० च्या आर्थिक संकटानंतरची सर्वांत कमी वाढ ठरली आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि इजिप्त या 
आखाती देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडून वाहतूक ५ जूनपासून बंद केली आहे. कतार दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या देशांनी केला होता. या निर्बंधांमुळे कतारमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या असून, शेअर बाजारात १८ टक्के घसरण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com